आई-वडिलांचा स्मृतिदिन दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत साजरा; स्नेहभोजनातून अँड गजेंद्र चंद्रे व पत्रकार सविता चंद्रे कुटुंबीयांनी जपली सामाजिक बांधिलकी! श्री शिवाजीराव मोघे निवासी मतिमंद विद्यालयात आगळावेगळा उपक्रम; दिव्यांग विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हास्यात शोधला आई-वडिलांच्या आठवणींचा आनंद!
आई-वडिलांचा स्मृतिदिन दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत साजरा; स्नेहभोजनातून अँड गजेंद्र चंद्रे व पत्रकार सविता चंद्रे व किरण चंद्रे कुटुंबीयांनी जपली सामाजिक बांधिलकी!
श्री शिवाजीराव मोघे निवासी मतिमंद विद्यालयात आगळावेगळा उपक्रम; दिव्यांग विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरील हास्यात शोधला आई-वडिलांच्या आठवणींचा आनंद
उमरखेड : आई-वडिलांचे छत्र हरपल्यानंतर त्यांच्या आठवणी मनाच्या प्रत्येक कोपऱ्यात कायम जिवंत राहतात. त्यांच्या प्रेमाची, संस्कारांची आणि आशीर्वादांची शिदोरी आयुष्यभर सोबत असते. मात्र या आठवणी केवळ स्वतःपुरत्या मर्यादित न ठेवता समाजातील गरजू आणि वंचित घटकांसोबत आनंद वाटून साजऱ्या केल्या, तर त्यातून खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जपली जाते. याच भावनेतून उमरखेड येथील चंद्रे कुटुंबीयांनी एक हृदयस्पर्शी आणि प्रेरणादायी उपक्रम राबविला.
ॲड. गजेंद्र चंद्रे, पत्रकार सविताताई चंद्रे आणि किरण चंद्रे यांच्या मातोश्री स्वर्गीय सूर्यकांता बाई उत्तमराव चंद्रे यांचे महिनाभरापूर्वी निधन झाले. या मातृवियोगाच्या दुःखातून कुटुंबीय सावरत असतानाच वडील स्वर्गीय उत्तमराव मारोतराव चंद्रे (निवृत्त RPF ASI) यांच्या स्मृतिदिनानिमित्त श्री शिवाजीराव मोघे निवासी मतिमंद विद्यालय, उमरखेड येथे दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत स्मृतिदिन साजरा करण्यात आला.
यावेळी विद्यालयातील दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी स्नेहभोजनाचे आयोजन करण्यात आले होते. आई-वडिलांच्या प्रतिमांना पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. त्यानंतर विद्यार्थ्यांसोबत आनंदाचे क्षण घालवत चंद्रे कुटुंबीयांनी आपल्या आई-वडिलांच्या स्मृतींना आगळ्या पद्धतीने उजाळा दिला.
दुःख विसरायला लावणारा विद्यार्थ्यांचा आनंद!
यावेळी मनोगत व्यक्त करताना कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲड. गजेंद्र चंद्रे म्हणाले की, दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत आई-वडिलांचा स्मृतिदिन साजरा करताना या विद्यार्थ्यांकडे पाहून माणूस आपले सर्व दुःख विसरून जातो. त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मनाला विलक्षण समाधान मिळते. आई-वडिलांच्या आठवणी जपत समाजातील या मुलांसोबत आनंद वाटून घेण्याचा हा आमचा छोटासा प्रयत्न आहे.
प्रमुख पाहुणे ॲड. संजीवकुमार जाधव यांनीही चंद्रे कुटुंबीयांच्या या उपक्रमाचे विशेष कौतुक केले. ते म्हणाले की, आपल्या आई-वडिलांचा स्मृतिदिन दिव्यांग विद्यार्थ्यांसोबत साजरा करण्याचा चंद्रे कुटुंबीयांचा निर्णय अत्यंत प्रेरणादायी आहे. दुःखाच्या प्रसंगातही सामाजिक बांधिलकी जपत केलेला हा उपक्रम निश्चितच समाजासमोर एक आदर्श निर्माण करणारा आहे.
‘आई-वडील पुन्हा कधीही मिळू शकत नाहीत!’
यावेळी पत्रकार सविता चंद्रे यांनी अत्यंत भावूक शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. त्या म्हणाल्या, “माझे आई-वडील आज प्रत्यक्षात आमच्यात नसले, तरी ते आमच्यासोबत कायम आहेत. त्यांचे आशीर्वाद सदैव आमच्या पाठीशी आहेत. या जगात सर्व काही मिळू शकते; मात्र आई-वडील पुन्हा कधीही मिळू शकत नाहीत.”
हे सांगताना त्यांचा कंठ दाटून आला. आई-वडिलांचे प्रेम, त्यांनी दिलेले संस्कार आणि त्यांचे आशीर्वाद हीच आयुष्यभराची खरी संपत्ती असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. त्यांच्या या भावनिक मनोगताने उपस्थितांचेही मन हेलावून गेले.
मान्यवरांची उपस्थिती
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ॲड. गजेंद्र चंद्रे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. संजीवकुमार जाधव, ॲड. संजय शिंदे, ॲड. जितेंद्र पवार, प्रा. संजय शिरगिरे, रत्नदीप धुळे, विद्यालयाचे मुख्याध्यापक विनोद मुटकुळे, अनुप गोमासे, संदीप चंद्रे, मंगेश चंद्रे, दिगंबर चंद्रे आणि माजी सैनिक हरीश मनवर उपस्थित होते.
तसेच रीता चंद्रे, शारदा चंद्रे, पल्लवी धुळे . शिलाताई शिरगीरे किरण चंद्रे, पत्रकार सविताताई चंद्रे, विद्यालयातील सर्व शिक्षक व कर्मचारीवृंद आणि दिव्यांग विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्मृतींना उजाळा देत सामाजिक सेवेचा अनोखा संदेश!
आई-वडिलांच्या स्मृतींना अभिवादन करताना दिव्यांग विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलविण्याचा चंद्रे कुटुंबीयांचा हा उपक्रम उपस्थितांच्या मनाला भावणारा ठरला. स्मृतिदिन केवळ औपचारिक कार्यक्रम म्हणून न साजरा करता तो सामाजिक सेवेच्या माध्यमातून साजरा करण्याचा त्यांचा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद आहे.
आई-वडिलांनी दिलेल्या संस्कारांचा वारसा पुढे नेत त्यांच्या स्मृती समाजोपयोगी कार्यातून जिवंत ठेवता येतात, हा मोलाचा संदेश चंद्रे कुटुंबीयांनी आपल्या कृतीतून दिला. खऱ्या अर्थाने आई-वडिलांना वाहिलेली ही भावपूर्ण श्रद्धांजली ठरली!

