मारवाडी फाटा येथे नाकाबंदीत 4 लाख 82 हजार बनावट नोटा जप्त स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळची कार्यवाही दोघांना घेतले ताब्यात.
मारवाडी फाटा येथे नाकाबंदीत 4 लाख 82 हजार बनावट नोटा जप्त
स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळची कार्यवाही दोघांना घेतले ताब्यात
बातमी पुसद…………………….
पुसद-वाशिम रोडवरील मारवाडी फाटा येथे नाकाबंदी करून वाहनांची तपासणी करण्यात आली. यावेळी एका स्कूटर चालकाच्या बॅगेची झडती घेतली असता, त्यामध्ये ५०० रुपयांच्या चार लाख ८२ हजारांच्या ९६४ बनावट नोटा सापडल्या. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने
गुरुवारी मध्यरात्री ही कारवाई केली असून, या प्रकरणी दोन संशयितांना ताब्यात घेतल्याचे पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड यांनी शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेमध्ये सांगितले.
पुसद येथील एक जण खऱ्या नोटांच्या मोबदल्यात ५०० रुपयांच्या पाचपट नोटा विक्री करत असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळाली होती. १ जूनच्या रात्री संबंधित व्यक्ती वाशिम येथून मारवाडी फाटामार्गे पुसद येथे येणार असल्याचे समजल्यानंतर स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मारवाडी फाटा येथे नाकाबंदी केली. यावेळी वाहन थांबवून तपासणी करण्यात येत होती. त्याचवेळी (एमएच २९, बीवाय ८६३७) क्रमांकाच्या मोपेडवरून एक व्यक्ती आला. पथकाने त्याला थांबवून त्याचे नाव विचारले असता, त्याने विशाल नागोराव पवार (३४, रा. खामनवाडी, पोस्ट कासोळा, ता. महागाव, ह. मु. धनराज फर्निचर, गांधीनगर, पुसद) असे सांगितले.
या व्यक्तीची तसेच त्याच्याकडील बॅगेची झडती घेतली असता, त्याच्याकडे ५०० रुपयांच्या बनावट नोटा आढळल्या. पथकाने त्याला ताब्यात घेत तो भाड्याने राहत असलेल्या घराची झडती घेतली. तेथे ५०० रुपयांच्या ९६४ बोगस नोटा सापडल्या. पथकाने विशालकडील मोपेडही जप्त केली आहे. या प्रकरणी त्याच्याविरुद्ध खंडाळा पोलिस ठाण्यात भादंवि कलम ४८९ (ब) (क), १२० (ब), ३४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे. गुन्ह्याची व्याप्ती मोठी असल्याने गुन्ह्यात सहभागी इतर आरोपींच्या शोधात स्थानिक गुन्हे शाखेची पथके रवाना करण्यात आली आहेत. दरम्यान, पोलिसांनी विनोद गंगाराम राठोड (४२, रा. सुभाष वाॅर्ड, पुसद) आणि बालू बाबूराव कांबळे (४६, रा. परळी वैजनाथ, जि. बीड) या दोन संशयितांना ताब्यात घेतले असून, त्यांच्याकडे या प्रकरणी सखोल चौकशी केली जात आहे. ही कारवाई सहायक पोलिस अधीक्षक पंकज अतुलकर, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक प्रदीप परदेशी, सहायक पोलिस निरीक्षक अमोल सांगळे, पोलिस उपनिरीक्षक सागर भारस्कर, पोलिस हवालदार सुभाष जाधव, कुणाल मुंडोकार, सोहेल मिर्झा, मोहम्मद ताज, सुनील पंडागळे, दिगंबर गीते आदींच्या पथकाने केली.