उमरखेड नगरपरिषद निवडणूक – पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात
उमरखेड नगरपरिषद निवडणूक : पोलिसांचा कडक बंदोबस्त तैनात
उमरखेड : – आज होणाऱ्या उमरखेड नगरपरिषद निवडणुकीदरम्यान शहरातील शांतता, सुव्यवस्था आणि सुरळीत मतदान प्रक्रियेसाठी पोलीस विभागाने कडेकोट बंदोबस्ताची तयारी केली आहे. पोलीस अधिक्षक डॉ. कुमार चिंता, अपर पोलीस अधिक्षक अशोक थोरात आणि उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली हा बंदोबस्त उभारण्यात आला आहे.
निवडणुकीदरम्यान संवेदनशील भागांसह एकूण ४४ मतदान केंद्रांवर मोठ्या प्रमाणात पोलिस यंत्रणा तैनात केली आहे. यात १२ पोलीस अधिकारी, १२२ पोलीस कर्मचारी, एसआरपीएफच्या ३ सेक्शन, १ आरसीपी पथक आणि ८२ होमगार्ड जवानांचा समावेश असून, अतिरिक्त बंदोबस्त म्हणून १ अधिकारी, ११ अंमलदार आणि ३० होमगार्ड यांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. मतदान केंद्रांच्या १०० मीटर परिसरात विशेष सुरक्षा बळ तैनात ठेवण्यात आले आहे.
मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रात किंवा १०० मीटरच्या आत कोणतीही गोंधळाची परिस्थिती, अनुचित वर्तन, असामाजिक कृत्ये तसेच सोशल मीडियावर जातीय तणाव भडकवणारे स्टेटस / कमेंट्स आढळल्यास संबंधितांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा ठाणेदार शंकर पांचाळ यांनी दिला.
निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व नागरिकांनी शांततेत मतदान करून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहनही यावेळी पोलीस विभागाकडून करण्यात आले.



