लोकनेते ॲड. अनंतराव देवसरकर यांची जयंती वृक्षारोपणाने साजरी उमरखेड,

लोकनेते ॲड. अनंतराव देवसरकर यांची जयंती वृक्षारोपणाने साजरी
उमरखेड,
विभागाचे माजी आमदार, यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे माजी अध्यक्ष, लोकनेते श्रद्धेय ॲड. अनंतराव देवसरकर यांची जयंती येथील गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालय परिसरात वृक्षारोपणासह विविध कार्यक्रमांनी साजरी करण्यात आली.
प्रार्थनेने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. मान्यवरांच्या हस्ते कै. ॲड. अनंतरावजी देवसरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. याप्रसंगी संभाजीराव नरवाडे, जेठमलजी बंग, दत्तराव शिंदे, तातुभाऊ देशमुख, ॲड. संतोष जैन, सुभाषराव शिंदे, प्रेमराव वानखेडे, गोपाल अग्रवाल, डॉ. कल्याणराव राणे, रामदास कदम यांच्यासह शिक्षण, सहकार, पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
याप्रसंगी गावंडे महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभागातील प्रा. डॉ. संदीप चेडे यांनी लिहिलेल्या उमरखेड परिसरात आढळणाऱ्या पक्ष्यांची माहिती देणाऱ्या ‘आपली पक्षी संपदा’ या पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच श्रद्धेय ॲड. अनंतराव देवसरकर यांचे सिंदगी येथील जीवलग सहकारी विठ्ठलराव सुरोशे यांचे नातू व साहेबराव सुरोशे यांचे चिरंजीव इयत्ता अकरावीत शिकणारा विद्यार्थी कृष्णा सुरोशे याने साकारलेल्या ॲड. अनंतरावजी देवसरकर यांच्या चित्राचे अनावरण करण्यात आले.
महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधवराव कदम यांच्या सहकार्याने समन्वयक प्रा. डॉ. प्रशांत अनासाने आणि इतर सहकारी प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थ्यांनी या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी परिश्रम घेतले.