विद्यार्थ्यांना दिलासा : आमदारांच्या पाठपुराव्यामुळे सुधारणा डोंगराळ प्रमाणपत्रावर चुकलेल्या गावांमध्ये अखेर झाली दुरुस्ती.
विद्यार्थ्यांना दिलासा : आमदारांच्या पाठपुराव्यामुळे सुधारणा
डोंगराळ प्रमाणपत्रावर चुकलेल्या गावांमध्ये अखेर झाली दुरुस्ती
प्रतिनिधी
उमरखेड :
डोंगराळ क्षेत्रातील रहिवासी असल्याच्या प्रमाणपत्रावर गावांची नावे हमखास चुकीची येत होती. त्यामुळे अनेक विद्यार्थ्यांना नोकरीसह शिक्षणातील आरक्षणाला मुकावे लागत होते. परंतु आता उमरखेड तालुक्यातील ही नावे दुरुस्ती करण्यात आली असून, याबाबत शासन आदेशही जारी करण्यात आला आहे. यासाठी आमदार नामदेव ससाने यांनी तिन वर्षापासून पाठपुरावा केल्याने ही दुरुस्ती झाली आहे .
शिक्षण तसेच नोकरीमध्ये महत्त्वाचा दस्तऐवज असलेले डोंगराळ प्रमाणपत्रामध्ये गावाची नावे चुकीची येत असल्याने विद्यार्थ्यांना नाहक त्रास होत होता. नोकरीमध्ये निवड झाल्यावरही गावाच्या नावाच्या दुरुस्तीमुळे नोकरी गमावण्याची वेळ येत होती. आमदार नामदेव ससाने यांच्या पाठपुराव्यामुळे गावाच्या नावातील चूक दुरुस्त झाली. गावांमध्ये जेवली, एकंबा रामपूर, घडोळी, सोईट, नवीन वालतूर आदींचा समावेश होता. आमदार एकेकाळी मुद्रांक विक्रेते तसेच आपले सेवा केंद्र चालक होते. त्यामुळे शैक्षणिक
कागदपत्रांमध्ये येणाऱ्या अडचणीची त्यांना जाण आहे. त्यांनी स्वतः लक्ष घालून डोंगराळ प्रमाणपत्रातील नावांची दुरुस्ती करण्याची प्रशासनाला विनंती केली. विशेष म्हणजे फक्त उमरखेडसाठी शासनाचा आदेश निघून डोंगराळ प्रमाणपत्रातील नावातील त्रुट्या निघाल्या. त्यामुळे विद्यार्थ्यांचा त्रास वाचणार आहे.
चौकट :
डोंगराळ प्रमाणपत्र नोकरी तसेच शिक्षणातील आरक्षणासाठी महत्त्वाचा दस्तावेज आहे. त्यामध्ये गावाची नावे चुकीची आल्याने विद्यार्थ्यांना त्रास होत होता. याबाबत काही विद्यार्थी तक्रारी करत होते. ही बाब मी आमदारांच्या निदर्शनास आणून दिल्यावर त्यांनी तातडीने याचा पाठपुरावा केला. आज शासनाचा आदेश निघून आपले सरकार पोर्टलवरसुद्धा गावांची चुकीची नावे बदलली गेली.
– आनंद देऊळगावकर, तहसीलदार, उमरखेड