पत्रकार सुरेश मस्के यांचे अपघाती निधन ; घातपात असल्याची पत्नीची तक्रार.
पत्रकार सुरेश मस्के यांचे अपघाती निधन ; घातपात असल्याची पत्नीची तक्रार
किनवट (लक्ष्मीकांत मुंडे)
येथील पत्रकार सुरेश दत्तात्रय मस्के यांचे शनिवारी दि.१४ रात्री किनवटच्या हमालपुरा भागात मोटारसायकल अपघातात मृत्यू झाला.त्यांचा अपघाती मृत्यू नसून,खून असल्याची तक्रार सुरेश मस्के यांच्या पत्नीने पोलिसांत दिली. पोलिसांत दिलेल्या तक्रारीत स्नेहा सुरेश मस्के यांनी नमूद केले आहे की,शनिवारी रात्री ८ च्या सुमारास मी व माझे पती पत्रकार सुरेश मस्के हे हमालपुरा येथील घरुन आमच्या चारचाकी वाहनाने माझ्या उपचारासाठी किनवटच्या खासगी दवाखान्यात जात होतो.वाटेत हबीब कॉलनीजवळ आमची कार बंद पडली.त्यानंतर सुरेश मस्के यांनी १ ऑटो बोलावून मला उपचारासाठी पाठवून दिले.यादरम्यान त्यांनी कुणाला तरी फोन करून गाडी बंद पडल्याचे सांगितले.माझ्यावरील उपचारानंतर रात्री अंदाजे १० च्या सुमारास डॉक्टरांनी मला डिस्चार्ज दिला.त्यानंतर मी घरी जाण्यासाठी पती सुरेश यांना फोन केला.त्यांनी मी १० मिनिटात येतो,असे मला सांगितले.खूप वेळ होऊनही सुरेश मस्के हे दवाखान्याकडे आले नसल्याने मी त्यांना ३ वेळा फोन केला.पण ते उचलले नाहीत.त्यानंतर गणेश गायकवाड या नातेवाइकाने मस्के यांच्या फोनवरून मला फोन करुन सुरेश मस्के हे गंभीर जखमी असून,त्यांच्या डोक्यातून रक्तस्राव होत असल्याचे सांगितले.मी ऑटोने तत्काळ घटनास्थळ गाठले.हमाल कॉलनीतील मशिदीजवळ सुरेश मस्के हे रक्ताच्या थारोळ्यात दिसून आले.त्यांच्या डोक्याला गंभीर जखमा होत्या.नातेवाईकांच्या मदतीने मी मस्के यांना तातडीने गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात आणले.तपासणीअंती डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.सुरेश मस्के यांचा अपघाती मृत्यू नसून त्यांचा कुणीतरी अज्ञात व्यक्तीने अज्ञात कारणासाठी हत्याराने खूनच केल्याची तक्रार स्नेहा मस्के यांनी दिली.त्यावरुन पोलिसांनी अज्ञातावर रविवारी रात्री गुन्हा दाखल केला.पोलीस निरीक्षक दीपक बोरसे अधिक चौकशी करीत आहेत. लोकस्वराज्य आंदोलनाचे नांदेड जिल्हाध्यक्ष धोंडोपंत बनसोडे यांनीही अज्ञातांवर खुनाचा गुन्हा दाखल करण्याची मागणी केली.रविवारी सायंकाळी गोकुंदा उपजिल्हा रुग्णालयात मस्के यांच्या शवाच्या विच्छेदनानंतर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले.नांदेड येथील पत्रकार रमेश मस्के यांचे ते ज्येष्ठ बंधु होत.