खासदार हेमंत पाटलाच्या अटकेसाठी आदिवासींचा दे धडक मोर्चा.
खासदार हेमंत पाटलाच्या अटकेसाठी आदिवासींचा दे धडक मोर्चा
उमरखेड : –
वैद्यकिय महाविद्यालय नांदेड येथील अधिष्ठाता यांना हीन वागणूक देणाऱ्या खासदार हेमंत पाटील यांना तात्काळ अटक करण्यात यावी यासह विविध मागण्या घेऊन आज दि 30 ऑक्टोंबर रोजी उपविभागिय अधिकारी कार्यालयावर आदिवासी कृती समितीचा दे धडक बेधडक मोर्चा धडकला.
नांदेड येथील डॉ. शंकरराव चव्हाण शासकिय वैद्यकिय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. श्याम वाकोडे व डॉ. किशोर राठोड यांना खासदार हेमंत पाटील यांनी हीन दर्जाची वागणूक दिल्याबद्दल त्यांचे विरुद्ध अॅट्रोसिटीचा गुन्हा दाखल होऊन बरेच दिवस लोटले परंतु राजकिय शक्तींपुढे नमते घेतल्याने कायदा गुंडाळून ठेवत त्यांना पोलीसांनी अद्याप अटक केली नाही , धनगरांना अनुसुचित जमातीत समाविष्ठ करून घेऊ नये , घुसखोरी करणाऱ्या बोगस आदिवासींना संरक्षण न देता थेट कार्यवाही करावी व घुसखोरी थांबवावी , 12 हजार 500 विशेष आदिवासी पदभरती तत्काळ झाली पाहिजे , भोगवटदार वर्ग 2 जमिनीच्या आपसी वाटण्या करून वर्ग 1 करण्याची कार्यवाही करावी , पैनगंगा अभयारण्यातील पुर्वापार वहिवाटीत असलेले रस्ते पक्के बांधून देण्यात यावे या प्रमुख मागण्यांसाठी आज दि. 30 ऑक्टोंबर रोजी सकाळी 11 वाजता स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रांगणातून शहरातील प्रमुख मार्गाने उपविभागीय अधिकारी कार्यालयावर देधडक बेधडक मोर्चा निघाला.
सदर मोर्चात तालुक्यातील आदिवासी समाज बांधवांनी मोठ्या संख्येने हजेरी लावली होती लहान मुला बाळासह वृद्ध व युवक वर्ग मोठ्या संख्येने या मोर्चामध्ये सामील झाला होता.
यावेळी आदिवासी कृती समितीचे अध्यक्ष उत्तमराव पांडे, उपाध्यक्ष शेषराव इंगळे , सचिव फकीरराव धनवे, कार्याध्यक्ष देविदास खोकले , नामदेव मुरमुरे , मारोती पिलवंड , अरुण टिळेवाड यांच्यासह आदिवासी समाजातील अनेक नेते, कार्यकर्ते , पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते .