न्यायालयाच्या माध्यमातून न्यायदानाचे काम करावे – न्यायमूर्ती विनय जोशी.
न्यायालयाच्या माध्यमातून न्यायदानाचे काम करावे
– न्यायमूर्ती विनय जोशी
उमरखेड दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालयाचे उद्घाटन
पुसद न्यायालयातील दोन हजार प्रकरणे हस्तांतरित
यवतमाळ – दि.२५ : उमरखेड वासियांसाठी दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालय सुरू होत आहे. या न्यायालयाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने न्यायदानाचे काम करावे, असे प्रतिपादन मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती विनय जोशी यांनी आज न्यायालयाच्या उद्घाटनावेळी केले.
दिवाणी व फौजदारी न्यायालयाच्या इमारतीत आयोजित या उद्घाटन कार्यक्रमास प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शिरीषकुमार हांडे, महाराष्ट्र बार कौन्सिलचे अध्यक्ष पारिजात पांडे, सदस्य ॲड आशिष देशमुख, उमरखेड दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर विनोद चव्हाण, यवतमाळ बार असोसिएशनचे अध्यक्ष संजय जैन, उमरखेड तालुका वकील संघाचे अध्यक्ष ॲड संतोष आगलावे विविध न्यायालयाचे न्यायाधीश, आर्णी, पुसद, महागाव तालुका बार कौन्सिलचे अध्यक्ष, वकील संघाचे सदस्य उपस्थित होते.
न्यायमूर्ती विनय जोशी म्हणाले, कायद्याचे राज्य आणायचे असेल तर त्यासाठी एक्ससेस टू जस्टीस आणि स्पिडी जस्टीस या संकल्पना महत्त्वाच्या आहेत. जलद न्याय करायचा असेल तर न्याय हा सर्वसामान्यांच्या दारी असले पाहिजेत. सर्वसामान्य माणसाला न्यायालयाची सुविधा शंभर किलोमीटर दूर असेल तर ते न्याय मिळण्यापासून वंचित राहतील. त्यामुळे या संकल्पनेतून उच्च न्यायालयाच्या प्रशासकीय समितीच्या दंडकानुसार शक्य तिथे जास्तीत जास्त न्यायालय सुरू करण्याची धारणा आहे, असे न्यायमूर्ती श्री. जोशी म्हणाले
न्यायमूर्ती श्री.जोशी पुढे म्हणाले, आनंदाने कोणीही न्यायालयात येत नाही आपल्या हक्क आणि न्यायासाठी जावे लागते. यापूर्वी उमरखेड आणि महागाव तालुक्यातील लोकांना लांब अंतरावरून पुसदच्या न्यायालयात जावे लागत होते, ते आता उमरखेडमध्ये सुरू झाले आहे. यापूर्वी कनिष्ठ स्तर न्यायालय होते. त्या न्यायालयात आर्थिक मर्यादा पाच लाखांपर्यंतचे खटले चालत होते. आता वरिष्ठ स्तर न्यायालयाला अमर्याद आर्थिक मर्यादा आहे. उमरखेडच्या न्यायालयात आता हजारो कोटींचे खटले चालू शकणार आहेत. त्याचबरोबर जवळजवळ दोन हजारहून अधिक खटले पुसद वरून उमरखेडला हस्तांतरित झालेले आहेत. त्यामुळे अनेक लोकांना या न्यायालयात उपस्थित राहता येणार आहे.
अनेक लोकांना पुसद ऐवजी उमरखेडमध्ये उपस्थित राहता येणार आहे. आर्थिक मर्यादा व्यतिरिक्त वैवाहिक प्रकरण, शासनाच्या विरोधातील प्रकरणे असे अनेक प्रकरणे या न्यायालयाच्या कक्षेत येतात. त्यामुळे अनेक फायदे झालेले आहेत. पक्षकारांना न्यायालयाचे कामकाज पाहता येणार आहे. न्यायाधीशांनीही न्यायदानाचे काम केले पाहिजेत. केस मार्गी लावण्यासाठी प्रकरणामध्ये प्रगती केली याचे समाधान न्यायाधीशांना असले पाहिजे. या वरिष्ठ स्तर न्यायालयाचा नागरिकांना फायदा होणार आहे, असेही न्यामूर्ती श्री. जोशी यांनी सांगितले.
अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालयाचा मार्ग मोकळा
उमरखेड येथे २०१९ साली अतिरिक्त जिल्हा न्यायाधीश स्तर न्यायालय मंजूर झाले आहे. उच्च न्यायालयाच्या एका निर्णयाच्या आधारे अतिरिक्त जिल्हा सत्र न्यायालय मिळविण्यासाठी मार्ग काढता येणार आहे. न्यायालय आपल्या दारी येऊन उपयोग नाही तर भरपूर काम करा. जुन्या प्रकरणांचा निपटारा करा. न्यायालयाच्या माध्यमातून खऱ्या अर्थाने न्यायदानाचे काम करावे, असे न्यायमूर्ती विनय जोशी यांनी मनोगत व्यक्त केले.
प्रमुख जिल्हा सत्र न्यायाधीश शिरीषकुमार हांडे अध्यक्षीय भाषणात म्हणाले, उमरखेड येथे दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर न्यायालयाचे उद्घाटन म्हणजे संघर्षाची पावती आहे. सर्वांची जबाबदारी आता वाढली आहे. उमरखेड येथे अतिरिक्त सत्र न्यायालय आणि जिल्हा न्यायालयाची मागणी पूर्ण होण्याच्या बेतात आहे. न्यायालयाकडून न्याय देण्याचे कार्य व्हावे, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
यावेळी महाराष्ट्र बार कौन्सिलचे अध्यक्ष पारिजात पांडे, सदस्य ॲड आशिष देशमुख यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक उमरखेड वकील संघाचे अध्यक्ष ॲड संतोष आगलावे यांनी केले तर उमरखेडचे नव नियुक्त दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर विनोद चव्हाण, यांनी आभार मानले.
न्यायमूर्ती विनय जोशी यांनी केली जागेची पाहणी
उमरखेड येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालयासाठी प्रस्तावित जागेची न्यायमूर्ती विनय जोशी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश शिरीषकुमार हांडे, महाराष्ट्र बार कौन्सिलचे अध्यक्ष पारिजात पांडे यांनी पाहणी केली. यावेळी उमरखेड वकील संघाचे अध्यक्ष ॲड संतोष आगलावे, उपाध्यक्ष ॲड राजेश हनवते, सचिव ॲड वैभव डांगे वकील संघ उमरखेड, कोषाध्यक्ष ॲड कोमल बजाज, भूमिअभिलेख अधिकारी, खसावत साहेब ,नायब तहसीलदार पवार, तलाठी व कर्मचारी उपस्थित होते.