ग्रामीण भागातचं खरी पत्रकारिता – अशोक वानखेडे, राष्ट्रीय संघटक, व्हॉईस ऑफ मीडिया वर्ध्यात पत्रकार कार्यशाळा व स्नेहमिलन सोहळा थाटात साजरा

ग्रामीण भागातचं खरी पत्रकारिता – अशोक वानखेडे, राष्ट्रीय संघटक, व्हॉईस ऑफ मीडिया
वर्ध्यात पत्रकार कार्यशाळा व स्नेहमिलन सोहळा थाटात साजरा
वर्धा : – वस्तुस्थिती मांडणे हे पत्रकारांच कामचं आहे. आपण बातमीसाठी धडपडता, परंतु अनेक अडचणी समोर येतात. त्यामुळे आता रडायचं नाही तर लढायचं, ग्रामीण भागातचं खरी पत्रकारिता शिल्लक आहे, शहरी भागात पत्रकारिता सुपिक शेती झाली आहे. असे परखड मत व्हॉईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय संघटक अशोक वानखेडे यांनी व्यक्त केले.
वर्धा जिल्हा व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने शहरातील महात्मा लॉनमध्ये पत्रकारांसाठी कार्यशाळा व स्नेहमिलन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. पुढे बोलताना पत्रकारांचे संघ भरपूर आहेत, परंतु व्हॉईस ऑफ मीडिया संघ नाही तर संघटना आहे. हा आपला परिवार आहे, हा आपला कौटुंबिक सोहळा आहे. ‘अपनी बात अपनो से कहने का सही मंच व्हॉईस ऑफ मीडिया है !’ आपण साऱ्या जगाचे प्रश्न, दुःख, वेदना मांडणारे, परंतु आपले पण काही प्रश्न आहेत आणि त्याकरिताच संदीप काळे यांनी व्हॉईस ऑफ मीडियाची स्थापना केली. चार वर्षांपूर्वी स्थापन करण्यात आलेल्या व्हॉईस ऑफ मीडियाचे जगभरात ४ लाख सदस्य आहेत. ४७ देशात संघटना पोहचली आहे. असे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी व्हॉईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे तर प्रमुख अतिथी राष्ट्रीय संघटक तथा राजकीय विश्लेषक अशोक वानखेडे, ज्येष्ठ विचारवंत व्यंकटेश जोशी, राष्ट्रीय महासचिव दिव्या भोसले, राज्य कार्यकारिणी सदस्य तथा ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कथले, यशवंत ग्रामीण शिक्षण संस्थेचे अध्यक्ष समीर देशमुख, प्रियंका देशमुख, मयुरी नव्हाते, सुपेकर, विदर्भ अध्यक्ष किशोर कारंजेकर, जिल्हाध्यक्ष नरेंद्र देशमुख आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
याप्रसंगी वर्ध्याचे पालकमंत्री नामदार डॉ पंकज भोयर यांनी पत्रकारांच्या समस्यांसाठी लढणाऱ्या व्हॉईस ऑफ मीडिया या संघटनेच्या कार्याचा गौरव करीत पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्यात. यावेळी राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे, महासचिव दिव्या भोसले, ज्येष्ठ विचारवंत व्यंकटेश जोशी, ज्येष्ठ पत्रकार प्रकाश कथले, समीर देशमुख यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
वर्धा जिल्हा व्हॉईस ऑफ मीडियाच्या वतीने दिला जाणारा यावर्षीचा “वर्धा दिप” सन्मान पालकमंत्री डॉ पंकज भोयर यांना प्रदान करण्यात आला.तर “वर्धा दर्पण” सन्मान ज्येष्ठ पत्रकार विनोदबाबू चोरडिया, “वर्धा रक्षक” सन्मान सेवानिवृत्त वनपाल अशोक भानसे, “वर्धा उद्यम” युवा उद्योजक सन्मान गौरेश बकाणे, “वर्धा कलारंग” सन्मान हिंगणघाट येथील टेलिव्हिजन कलाकार मयुरी नव्हाते यांना प्रदान करण्यात आला. यावेळी पत्रकारिता क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जिल्ह्यातील पत्रकारांना देखील सन्मानित करण्यात आले. यामध्ये अमोल सोटे आष्टी, संजय देसाई आष्टी, निलेश बंगाले तळेगांव श्यामजीपंत, जगदीश कुर्डा कारंजा, गजानन बाजारे कारंजा, सुरेंद्र डाफ आर्वी, विनय इंगळे आर्वी, विनोद घोडे देवळी, राजू वाटाणे देवळी, हर्षल काळे पुलगांव, रेणुका कोटंबकार सेलू, एकनाथ चौधरी वर्धा, पंढरी काकडे वर्धा, सुरेंद्र रामटेके वर्धा, सचिन पोफळी वर्धा, रुपराव मोरे आंजी, आशिष इझनकर वर्धा, भारत घवघवे सेलू, प्रशांत कलोडे सिंदी रेल्वे, प्रा अजय मोहोड हिंगणघाट, सोनू आर्या हिंगणघाट, शांतीलाल गांधी समुद्रपूर, किशोर आस्कर समुद्रपूर, बादल वानकर समुद्रपूर यांचा समावेश आहे. यासोबतच संघटनात्मक पातळीवर उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्हॉईस ऑफ मीडियाच्या शिलेदारांचा देखील सत्कार करण्यात आला. यामध्ये सेलू तालुका अध्यक्ष सचिन धानकुटे, आर्वी तालुका अध्यक्ष राजू श्रीहरी डोंगरे आणि सिंदी रेल्वे महानगर कार्यकारिणी अध्यक्ष आनंद छाजेड यांना राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे व राष्ट्रीय संघटक अशोक वानखेडे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.
यासोबतच भरकटत जाणाऱ्या तरुणाईला संदेश देणाऱ्या हृदयस्पर्शी व्याख्यानाचे आयोजन आदल्या दिवशी शहरातील यशवंत महाविद्यालयाच्या प्रांगणात करण्यात आले होते. यावेळी डॉ वसंत हंकारे यांच्या ‘बाप समजून घेताना’ आणि व्हॉईस ऑफ मीडियाच्या राष्ट्रीय सचिव दिव्या भोसले यांचे ‘युवा राष्ट्राचा आधार’ या हृदयस्पर्शी व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला विद्यार्थ्यांसह पालकवर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा सचिव एकनाथ चौधरी यांनी तर सूत्रसंचालन उपाध्यक्ष निलेश पिंजरकर यांनी केले. जिल्हा उपाध्यक्ष प्रफुल्ल लुंगे यांनी आभार मानले. कार्यक्रमाला व्हॉईस ऑफ मीडियाचे पदाधिकारी व सदस्य तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.