शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काँग्रेसचा विराट ट्रॅक्टर मोर्चा एसडीओ कार्यालयावर धडकला (शेकडो ट्रॅक्टरसह कॉग्रेसी धडकले ; शेतकऱ्यासाठीच पैशे नाहीत ; सरकारवर गंभीर आरोप ) उमरखेड :

शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी काँग्रेसचा विराट ट्रॅक्टर मोर्चा एसडीओ कार्यालयावर धडकला
(शेकडो ट्रॅक्टरसह कॉग्रेसी धडकले ; शेतकऱ्यासाठीच पैशे नाहीत ; सरकारवर गंभीर आरोप )
उमरखेड :
तालुक्यातील अतिवृष्टी आणि पैनगंगा नदीच्या पुरामुळे झालेल्या शेती व घरांच्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांना भरीव मदत मिळावी, या सहित 21 मागण्यांसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने आज उमरखेड येथे विराट ट्रॅक्टर मोर्चा काढण्यात आला. यावेळी शेकडो ट्रॅक्टरसह कार्यकर्ते रस्तावर उतरले होते
स्थानिक कृषी उत्पन्न बाजार समितीपासून निघालेल्या शेकडो ट्रॅक्टरच्या या मोर्चाने शहरातील प्रमुख मार्गांनी मार्गक्रमण करत उपविभागीय अधिकारी कार्यालयावर धडक दिली. या मोर्चाचे नेतृत्व माजी मंत्री वसंतराव पुरके,सचिन नाईक, तातू देशमुख,साहेबराव कांबळे, राम देवसरकर, दत्तराव शिंदे, नंदकिशोर अग्रवाल, गोपाल अग्रवाल यांनी केले.
यावेळी काँग्रेसने सादर केलेल्या प्रमुख मागण्यांमध्ये, उमरखेड तालुका ओला दुष्काळ जाहीर करावा,सन 2025 -26 खरीप हंगामातील महापुरामुळे नष्ट झालेल्या पिकांची शासकीय सानुग्रह अनुदान तीन हेक्टर पर्यंत मर्यादा ठेवावी ,शेतकरी व शेतमजुरांची सरसकट कर्जमाफी करावी , महापुरामुळे झालेल्या नुकसानीला हेक्टरी 50 हजार रुपये अनुदान द्यावे,महापूर व अतिवृष्टीने खरडून गेलेल्या जमिनीची 1 लाख रुपये नुकसान भरपाई द्यावी ,सहस्रकुंड जलविद्युत प्रकल्प कायमस्वरूपी रद्द करावा ,शेतकऱ्यांच्या सोयीचा नसलेला शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा , विधानसभा निवडणुकीत खोटे मतदान समाविष्ट केलेल्या याद्या अद्यावत कराव्या , सुशिक्षित बेरोजगारांना शासकीय भत्ता देऊन नोकरीत समाविष्ट करावे , स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसी प्रमाणे शेतमालाला भाव देऊन आयात कर वाढवून निर्यातीवरील बंधने काढून निर्यात कर रद्द करावे , मध्य प्रदेश सरकारच्या धोरणाप्रमाणे सोयाबीन साठी भावांतर योजना राबवावी , शेतमजुरांना रोजगार हमीची कामे उपलब्ध करावी,तालुक्यातील विविध ठिकाणचे रस्ते दुरुस्ती करावी ,वसंत सहकारी साखर कारखाना गळीत हंगाम 2024 25 मधील उसाचे वाढीव 300 रुपये मिळावे अशा आनेक मागण्या करण्यात आल्या.
मोर्चाला संबोधित करताना वसंतराव पुरके यांनी विद्यमान सरकारवर तीव्र टीका करत, न्यायव्यवस्थेची गळचेपी करून देशात अराजकता निर्माण झाली आहे. मानवतेसाठी काँग्रेससोबत एकजुटीने उभे राहा,असे आवाहन केले. यासह शेतकऱ्यांना ठगुन सत्तेवर आलेल्या सरकारला शेतकऱ्यांनी धडा शिकवण्याचेहि आव्हान केले.मोर्चाला साहेबराव कांबळे, तातू देशमुख, सचिन नाईक, राम देवसरकर, खाजाभाई कुरेशी, देवानंद मोरे आदींनीही शासनाच्या धोरणावर सडकून टीका करत शेतकऱ्यांच्या हिताचे धोरण राबवावे, अशी मागणी केली. या विराट ट्रॅक्टर मोर्चाच्या यशस्वी आयोजनासाठी असंख्य कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले.
v6u9rr