उमरखेड आगाराला अमरावती विभागात पहिला क्रमांक उमरखेड (प्रतिनिधी) :
उमरखेड आगाराला अमरावती विभागात पहिला क्रमांक
उमरखेड (प्रतिनिधी) :
हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे स्वच्छ सुंदर व स्थानक अभियानांतर्गत अमरावती प्रदेशात झालेल्या द्वितीय सर्वेक्षणात उमरखेड आगाराने प्रथम क्रमांक पटकावला आहे.
या यशामागे अभियान समितीचे अध्यक्ष नितीन भुतडा यांचे मार्गदर्शन आणि आगार व्यवस्थापक प्रमोद किनाके यांचे नियोजन महत्त्वाचे ठरले. त्यांनी लोकसहभागातून अनेक उपक्रम राबवले.
बसस्थानकाच्या सौंदर्यवर्धनासाठी सहस्त्रभाऊ चॅरिटेबल ट्रस्ट यांनी विद्यार्थ्यांसाठी डेक्स दिले, ज्येष्ठ नागरिकांसाठी चबुतरा उभारण्यात आला. औदुंबर वृक्ष संवर्धन समिती व युथ फाउंडेशन यांनी बगीचा क्रमांक दोन तयार केला. स्टेट बँक ऑफ इंडिया यांनी स्तनदा मातांसाठी हिरकणी कक्ष, तर अनमोल कलेक्शन आणि शिवम प्रिंटर्स यांनी वेळापत्रक व मार्गफलक उपलब्ध करून दिले.
डॉ. खांबाळकर, एकता ज्वेलर्स व राजमाता जिजाऊ बँक यांनी स्थानकाची रंगरंगोटी केली. बगीचा क्रमांक एक हा रा.प. कर्मचारी वर्गाच्या वर्गणीतून तयार करण्यात आला. शहजादा यांच्या मदतीने १० सिमेंटचे पोल, आणि युथ फाउंडेशन मार्फत तारेची जाळी बसवून अनधिकृत वाहनांना आळा घालण्यात आला.
प्रवाशांना उन्हाळ्यात थंड व शुद्ध पाणी मिळावे म्हणून श्रीराम सारडा आणि दत्तात्रय दुर्गेवार (रोटरी क्लब उमरखेड) यांनी वॉटर फिल्टर बसवला.
या सर्व उपक्रमांमुळे उमरखेड बसस्थानकाचे रूपडे बदलले असून स्वच्छता, सुविधा आणि सौंदर्य या तिन्ही बाबतीत उमरखेड आगाराने आदर्श निर्माण केला आहे. त्यामुळे आज उमरखेड आगाराचे नाव अमरावती विभागात पहिल्या क्रमांकावर झळकत आहे.



