ढाणकीकरांची उमरखेड फेऱ्यातुन होणार सुटका यासाठी अधिकारी – कर्मचाऱ्यांची नियुक्ती – महसूल कामांना मिळणार गती – दुर्गम भागातील नागरिकांना मोठा दिलासा
ढाणकीकरांची उमरखेड फेऱ्यातुन होणार सुटका यासाठी अधिकारी – कर्मचाऱ्यांची नियुक्ती – महसूल कामांना मिळणार गती – दुर्गम भागातील नागरिकांना मोठा दिलासा
उमरखेड :
उमरखेड तालुक्यातील ढाणकी व परिसरातील दुर्गम, जंगल भागातील नागरिकांना महसूलविषयक कामांसाठी वारंवार उमरखेडला जावे लागू नये, यासाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचलण्यात आले आहे. जिल्हाधिकारी, यवतमाळ यांनी नवनिर्मित अपर तहसील कार्यालय, ढाणकी येथे अधिकारी व कर्मचाऱ्यांची नियुक्ती तसेच अतिरिक्त पदभार सोपविण्याचे आदेश काढले आहेत. त्यामुळे ढाणकी अपर तहसील कार्यालय प्रत्यक्ष कार्यान्वित होण्याचा मार्ग मोकळा झाला असून, या निर्णयामुळे परिसरातील ग्रामीण नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. आदेशानुसार उमरखेड तहसील कार्यालयातील परि. तहसीलदार श्री. रोहित शिंदे यांच्याकडे अपर तहसीलदार, ढाणकी या पदाचा अतिरिक्त पदभार सोपविण्यात आला आहे. तसेच नायब तहसीलदार (महसूल) श्री. वैभव पवार यांच्याकडे नायब तहसीलदार, अपर तहसील कार्यालय ढाणकी या पदाचा अतिरिक्त पदभार देण्यात आला आहे. महागाव तहसील कार्यालयातील सहाय्यक महसूल अधिकारी श्री. जी. जे. चौधरी यांची अपर तहसील कार्यालय ढाणकी येथे सहाय्यक महसूल अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तर उमरखेड तहसील कार्यालयातील महसूल सहाय्यक श्री. ए. डी. गुट्टे यांची अपर तहसील कार्यालय ढाणकी येथे महसूल सहाय्यक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. नवनिर्मित अपर तहसील कार्यालयात आवश्यक अधिकारी व महसूल कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आल्याने आता ढाणकी परिसरातील नागरिकांना विविध महसूलविषयक कामांसाठी उमरखेड तहसील कार्यालयाच्या फेऱ्या मारण्याची गरज मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. विशेषतः ढाणकी परिसरातील दुर्गम व जंगल भागातील गावांमधील नागरिकांसाठी हा निर्णय महत्त्वाचा मानला जात आहे. उत्पन्नाचे दाखले, महसूल नोंदी, जमिनीशी संबंधित कामे, विविध शासकीय योजनांसाठी आवश्यक महसूल कागदपत्रे तसेच अन्य प्रशासकीय कामांसाठी नागरिकांना मोठा प्रवास करावा लागत होता. अपर तहसील कार्यालयामुळे ही कामे स्थानिक पातळीवर अधिक सुलभ होण्याची अपेक्षा आहे. ढाणकी परिसर भौगोलिकदृष्ट्या उमरखेडच्या मुख्यालयापासून दूर असून, अनेक गावांना जंगल व दुर्गम मार्गातून प्रवास करावा लागतो. त्यामुळे एखाद्या छोट्या महसूल कामासाठीही नागरिकांचा वेळ, पैसा आणि श्रम खर्ची पडत होते. विशेषतः शेतकरी, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना याचा अधिक त्रास सहन करावा लागत होता. आता ढाणकी येथे अपर तहसील कार्यालयाची प्रशासकीय यंत्रणा उपलब्ध होणार असल्याने नागरिकांच्या अडचणी कमी होण्यास मदत होणार आहे. ढाणकी व परिसरातील नागरिकांच्या अनेक वर्षांच्या मागणीला या आदेशामुळे मूर्त स्वरूप मिळाले आहे. येथील फुलसावंगी रोडवरील बंद पडलेल्या शासकीय दुध संकलन केंद्राच्या ईमारतीत हे कार्यालय सुर होत आहे. ढाणकी येथे अधिकारी-कर्मचारी नियमितपणे उपलब्ध राहणे आणि नागरिकांची महसूलविषयक कामे वेळेत निकाली काढणे गरजेचे आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशामुळे त्यासाठी आवश्यक मनुष्यबळाची प्राथमिक व्यवस्था झाल्याने दुर्गम भागातील नागरिकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत.

