उमरखेडच्या वीराने देशपातळीवर झळकावला मानाचा मुकुट….
उमरखेडच्या वीराने देशपातळीवर झळकावला मानाचा मुकुट….
उमरखेड/प्रतिनिधी –
उमरखेड येथील बंग परिवाराची कन्या वीरा मुकेश बंग हिने देशपातळीवर आपली प्रतिभा सिद्ध करत ‘ज्युनिअर मिस इंडिया’ (८ ते १० वयोगट – सांस्कृतिक फेरी) हा मानाचा किताब पटकावला आहे. या उल्लेखनीय यशामुळे उमरखेडसह संपूर्ण नागपूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.
९ वर्षीय वीरा बंग ही उमरखेड येथील डॉ. मुकेश बंग व डॉ. स्मिता बंग यांची कन्या असून, उमरखेड येथील राधेश्यामजी बंग व पद्मावती बंग यांची नात आहे. ती सध्या भवन्स बी. पी. विद्यालय, अष्टी (नागपूर) येथे इयत्ता चौथीत शिक्षण घेत आहे.
ज्युनिअर मिस इंडिया २०२६ ही जगातील सर्वात मोठी गर्ल चाइल्ड स्पर्धा असून, ही स्पर्धा ६ ते ८ जानेवारी २०२६ दरम्यान जयपूर (पिंक सिटी) येथे पार पडली. या भव्य स्पर्धेत देशभरातून निवड झालेल्या १७२ स्पर्धकांनी अंतिम फेरीत सहभाग घेत आपल्या संस्कृतीचे सादरीकरण केले.
सांस्कृतिक फेरीत वीरा बंग हिने हिंदू संस्कृतीतील आदिशक्ती ‘देवी काली’चे प्रभावी रूप साकारत परीक्षकांचे विशेष लक्ष वेधून घेतले. स्त्रीशक्ती, आत्मसन्मान व धैर्याचे प्रतीक असलेल्या देवी कालीच्या सादरीकरणातून “प्रत्येक स्त्रीमध्ये कालीची शक्ती दडलेली असून, सन्मानाला आव्हान मिळाल्यास ती अग्नीसारखी उभी राहू शकते,” हा सशक्त संदेश तिने प्रभावीपणे मांडला.
आपल्या आत्मविश्वास, सादरीकरण, बुद्धिमत्ता व करिष्म्याच्या जोरावर वीरा बंग हिने हा बहुमान पटकावत महाराष्ट्र व नागपूरचे राष्ट्रीय पातळीवर प्रतिनिधित्व केले.
या यशाबद्दल वीरा बंग हिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत असून, तिच्या उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.
ही कामगिरी उमरखेड साठी अभिमानास्पद असून, अनेक बालकांसाठी प्रेरणादायी ठरणारी आहे.



