जागतिक चिमणी दिवसानिमित्त मातीच्या जलपात्रांचे वितरण.
जागतिक चिमणी दिवसानिमित्त मातीच्या जलपात्रांचे वितरण
नैसर्गिक पर्यावरण संवर्धन संस्थेचा उपक्रम
उमरखेड :-
भारतात सगळीकडे सर्वात जास्त संख्येने सापडणारा, माणसाच्या जवळ राहणारा आणि त्यामुळे नेहमी दिसू शकणारा पक्षी अशी चिमणीची ओळख आहे. परंतु दिवसेंदिवस होत चाललेल्या विकासाच्या नावाखालील बदलामुळे आता या चिमण्यांच्या वास्तव्याला धोका निर्माण झाला आहे. यासाठी नागरिकांमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी २० मार्च हा दिवस “जागतिक चिमणी दिवस” म्हणून सर्वत्र साजरा केल्या जातो.
पूर्वीच्या काळी प्रत्येक घरी अंगण, अंगणात झाड असायचे आता घरात अंगण नाही, झाडे नाहीत, वळचळणीसाठी जागा नाही, त्यामुळे चिमण्यांची संख्या झपाट्याने घटत आहे. वाढते औद्योगीकरण, तापमानात होणारे बदल ,सततची होणारी वृक्षतोड व मानवांच्या राहणीमानातील बदलामुळे एकीकडे चिमण्या लुप्त होतात की काय ? अशी भीती निर्माण झाली आहे.
कीटक भक्षी असलेल्या चिमणी सारख्या पक्ष्यांची संख्या कमी होणे हे मानवासाठी धोकादायक आहे. चिमण्या लुप्त होण्यामुळे पर्यावरणापुढे अनेक धोके उभे राहिले आहेत. जगभरातील तज्ञांच्या अभ्यासांती “चिमणी जगायला हवी” याची जाणीव झाली आहे. चिमण्यांची संख्या कमी झाल्याने त्याचा थेट परिणाम शेती पिकावर झाला आहे. पिकावर पडणाऱ्या रोगराईचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहे. चिमण्या नैसर्गिक पद्धतीने पिकाचे संरक्षण करतात. आता उन्हाचाही तडाखा सर्वत्र वाढत आहे. माणसांसह चिमणी व ईतर पक्षीसुध्दा उकाड्याणे हैराण होत आहेत, शहरांमध्ये सिमेंटच्या घरावर पक्षांना घरटी बांधणे शक्य नसल्याने याचा सर्वाधिक फटका चिमण्यांवर बसला आहे. रणरणत्या उन्हात पक्षांना पाण्यासाठी भटकंती करावी लागते. पाणी न मिळाल्याने पक्षांचा मृत्यू होतो, यासाठी नैसर्गिक पर्यावरण संवर्धन संस्था उमरखेड तर्फे जागतिक चिमणी दिनानिमित्त चिमण्यांसाठी जलपात्राचे वाटप करण्यात येऊन, “चिमणी वाचवा पर्यावरण वाचवा” हा संदेश देण्यात आला.
आपल्या घराजवळ ,बाहेर, घराच्या परिसरात, छतावर चिऊताई साठी दाणापाणी ठेवून चिमणी वाचवून त्यांचे संवर्धन करण्यासाठी ही लोकचळवळ गावाखेड्यातील प्रत्येक घरापर्यंत पोहोचवू हा ध्यास प्रत्येकाने ठेवल्यास निश्चितच चिमण्यांचा तो चिवचिवाट प्रत्येकांना पुन्हा ऐकायला येईल असा आशावाद नैसर्गिक पर्यावरण संवर्धन संस्थेचे प्रभाकर दिघेवार यांनी व्यक्त केला. कार्यक्रमासाठी गजानन रासकर, दीपक ठाकरे व इतर सर्व सदस्यांचे सहकार्य लाभले.