शक्तिपीठ महामार्गाला उमरखेडच्या बेलखेड शिवारातील शेतकऱ्यांचा तिव्र विरोध  :मोजणीस आलेल्या प्रशासकीय पथकाला शेतकऱ्यांनी माघारी धाडले :

youtube

शक्तिपीठ महामार्गाला उमरखेडच्या बेलखेड शिवारातील शेतकऱ्यांचा तिव्र विरोध

:मोजणीस आलेल्या प्रशासकीय पथकाला शेतकऱ्यांनी माघारी धाडले :

प्रतिनिधी । उमरखेड :

राज्य शासन व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शक्तिपीठ महामार्ग व्हावा म्हणून आग्रही असताना या महामार्गावरील शेती मोजणी कामाला गती आली आहे . त्या संदर्भात महसूल प्रशासनाचे पथक इथून जवळच असलेल्या बेलखेड शिवारातील पांदण रस्त्यावर येणाऱ्या शेत मोजणीस गेले होते . सकाळी दहा वाजता गेलेले पथक शेतकऱ्यांच्या तीव्र विरोधामुळे दुपारी एक वाजता माघारी परतले .

उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे हे भुमीअभिलेख विभागाचे अधिकारी , कृषी सहायक, तलाठी, संबंधीत मोनार्च कंपनीचे अधिकारी व दंगल नियंत्रण पथकासह शक्तीपिठ महामार्ग यासंदर्भात मोजणीसाठी बेलखेड शिवारात सकाळी दहा वाजता पोहोचले.यावेळी जवळपास 100 शेतकऱ्यांनी आम्हाला जमिनी द्यायच्या नाही ! समांतर रस्ता नागपूर बोरी तुळजापूर महामार्ग बाजूनेच असताना या शक्तिपीठ महामार्गाचा अट्टाहास कशासाठी शासन करत आहे याचा जाब यावेळी शेतकऱ्यांनी प्रशासनाच्या अधिकाऱ्यांना विचारला . पैशाच्या मोबदल्यात आमची चांगली कसदार जमीन घेऊन आम्हाला नागवे करण्यापेक्षा गोळ्या झाडा असेही यावेळी शेतकऱ्यांनी सांगितले . यावेळी हे शक्तिपीठ महामार्ग कुठल्याही परिस्थितीत होणारच असून तुम्हाला योग्य मोबदला मिळेल असे सांगून आज जरी मोजणी झाली नाही मात्र मोजणी तर होईलच असे उपविभागीय अधिकारी यांनी सांगितल्याने संतप्त झालेल्या शेतकऱ्यांनी तुम्ही आम्हाला मारा ! जमिनी घ्या ! आमच्या मरणा नंतरच जमीन हस्तांतर करा ! असे ठणकावुन सांगितले .दोन तासाच्या विरोधानंतर शेतकऱ्यांनी शेवटी आम्हाला हा शक्तिपीठ मार्ग आमच्या शेतातून नकोच ! अशी एकमेव मागणी केल्याने पथकाला माघारी परतावे लागले . या शक्तिपीठ महामार्गात बेलखेड शिवारातील जवळपास 50 हेक्टर सुपीक जमीन जाणार असून बाजू बाजूच्या दहागाव सुकळी येथील व महागाव तालुक्यातील शेतकऱ्यांनी जमिनीची मोजणी करून दिली असून मोबदल्याच्या रकमेबाबत समाधान होईल यादृष्टीने शेतकऱ्यांना पैसे देऊ असे यावेळी उपविभागीय अधिकारी यांनी सांगितले . शेतकऱ्यांनी यावर कितीही पैसे दिले तरी आम्ही जमीन देणार नाही ! पुन्हा शेत मोजणीस आल्यास सहकुटुंब आम्ही आत्महत्या करू असा इशाराही यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी दिला आहे .
यावेळी सिद्धेश्वर जगताप, सचिन शिंदे ,नारायण शिंदे , शिवाजी शिंदे ,स्वप्निल शिंदे ,विजय आलट , अशोक फटिंग , कैलास कदम, मारोतराव पाटील यांच्यासह शेकडो शेतकरी उपस्थित होते .

चौकट :

हे सरकार शक्तिपीठ महामार्गासाठी जो काही अट्टाहास करीत आहे . आमच्या सुपीक जमिनी पुन्हा आम्हाला मिळणार नाही . बेरोजगारी वाढली आहे . अशा परिस्थितीत शेतजमिनीच्या भरोशावर कुटुंबाचा गाडा आम्ही हाकीत आहोत . त्यामुळे शासनाने हे शक्तिपीठ महामार्ग रद्द करावा . आम्ही मेलो तरी जमीन देणार नाही . आम्हाला धाक दाखविण्याचा प्रयत्न जर केला तर आम्ही धाकाला भीक घालणार नाही .

सिद्धेश्वर जगताप
शेतकरी बेलखेड शेत शिवार.

कोट :

राज्य शासनाचा हा प्रायव्हिटी चा प्रोजेक्ट असून यामध्ये शासनाचे धोरण ठरले आहे . वर्धा , यवतमाळ ,आर्णि, राळेगाव व कळंब या तालुक्यातील मोजण्या शंभर टक्के झाले असून त्यांच्या शीटही तयार झालेले आहेत. कलम 15 व कलम 18 नुसार ज्यांची नोटिफिकेशन होईल त्यांना येत्या ऑक्टोबर दिवाळीला शेतकऱ्यांना पैसे मिळणार आहेत . असं नाही की हा प्रोजेक्ट कॅन्सल होणार आहे . शेतकऱ्यांनी आंदोलन केले म्हणून आम्ही त्रास देणार नाही . शेतकऱ्यांनी सहकार्याची भूमिका ठेवावी . यानंतर शासन जो निर्णय घेईल त्यानुसारच आम्ही काम करणार आहोत .
सखाराम मुळे
उपविभागीय अधिकारी , उमरखेड .

सोबत फोटो :
उपविभागीय अधिकारी मुळे शेतकऱ्यांशी चर्चा करतांना .

Google Ad
Google Ad

1 thought on “शक्तिपीठ महामार्गाला उमरखेडच्या बेलखेड शिवारातील शेतकऱ्यांचा तिव्र विरोध  :मोजणीस आलेल्या प्रशासकीय पथकाला शेतकऱ्यांनी माघारी धाडले :

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!