माहूर शहरातील गणपती विसर्जन शांततेत संपन्न.

youtube

माहूर शहरातील गणपती विसर्जन शांततेत संपन्न.

श्रीक्षेत्र माहूर –

गणपती बाप्पा मोरया,मंगल मूर्ती मोरया,पुढच्या वर्षी लवकर या’ च्या गजरात आणि बँड, ढोल ताशे या पारंपरिक वाद्यांसह डीजेच्या आवाजावर नाचणाऱ्या हजारो युवकांच्या उपस्थितीत मिरवणुकीने माहूर शहारातील तेराही सार्वजनिक गणेश मंडळाच्या गणेशाचे दि.१० सप्टें. रोजी रात्री उशीरा पैनगंगा नदी पात्रात विसर्जन झाले.
गणरायाच्या मिरवणुकीला दु.४ वा. सुरुवात झाली. मिरवणुक नगर पंचायत कार्यालयासमोर येताच नगराध्यक्ष फिरोज दोसाणी,मुख्याधिकारी राजकुमार राठोड,उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड, वैजनाथ स्वामी यांनी तर छत्रपती चौकात शिवसेनेच्या वतीने जिल्हा उपप्रमुख ज्योतिबा दादा खराटे व सोनापिर बाबा दर्गाह कडून मुजावर फकीर महमद यांनी गणेश मंडळाच्या सर्वच अध्यक्षांचे शाल श्रीफळ देवून स्वागत केले. यावेळी त्यांचे समवेत ज्येष्ठ पत्रकार वसंत कपाटे, विजय आमले, जयंत गिऱ्हे, डॉ.पदमाकर जगताप,राजू जहागीरदार यांची उपस्थिती होती.

सकाळी पोलिसांनी काही गणेश मंडळाचे डीजे ताब्यात घेतल्याने गणेश मंडळाच्या पदाधिकांऱ्यासह शिवसेना युवासेनेचे तालुकाप्रमुख विकास कपाटे,आशिष चारभाई (शिंदे गट), विशाल शिंदे,अभिषेक त्रिपाठी,सोनू चौधरी, पवन शर्मा,योगेश दातिर,अशोक उप्पलवाड आदी मंडळी संतप्त झाली होती. त्यांनी प्रथम संपूर्ण बाजारपेठ बंद केली.पुढे शेकडो तरुणांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकात ठिय्या मांडून रास्ता रोको आंदोलन केले.नगराध्यक्ष फिरोज दोसाणी, उपनगराध्यक्ष ज्ञानेश्वर लाड,अनिल वाघमारे, सागर महामुने,निरधारी जाधव व पत्रकारांनी केलेली मध्यस्थी आणि आ.भिमराव केराम यांनी पो.नि.नामदेव रीठ्ठे यांना केलेला फोन कामी आला.शेवटी पोलिसांना डीजे वाजविण्यासाठी परवानगी द्यावीच लागली.ती मिळताच गणेश मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी विसर्जन मिरवणुकीच्या तयारीला सुरुवात केली.मागील दहा दिवसात गणेश मंडळाने उभारलेले नयनरम्य देखावे, मनोभावे केलेली पूजा/अर्चा,विविध स्वरूपाच्या घेतलेल्या स्पर्धा, घेतलेले सांस्कृतिक कार्यक्रम,महा प्रसादाचे केलेले आयोजन आदी बाबीमुळे शहरात सर्वत्र चैतन्यमय वातावरण पसरले होते.

नदी पात्रात श्री च्या मूर्तीचे विसर्जन करण्यासाठी एकलारे कन्स्ट्रक्शनच्या वतीने क्रेनची व्यवस्था करण्यात आली होती.विसर्जन स्थळी नगर पंचायतचे सर्व अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.उपविभागीय पोलीस अधिकारी विजय डोंगरे यांचे मार्गदर्शनात पो. नि. नामदेव रीठे, स.पो.नि. अण्णासाहेब पवार, संजय पवार,श्रीधर जगताप, पो. उप. नि. शरद घोडके व त्यांच्या अधीनस्थ कर्मचाऱ्यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

Google Ad
Google Ad

1 thought on “माहूर शहरातील गणपती विसर्जन शांततेत संपन्न.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!