मराठा समाजाला तात्काळ आरक्षण देऊन मनोज जरांगे पाटलांचा जीव वाचवा – मा. आ. प्रकाशपाटील देवसरकर.
मराठा समाजाला तात्काळ आरक्षण देऊन मनोज जरांगे पाटलांचा जीव वाचवा – मा. आ. प्रकाशपाटील देवसरकर
उमरखेड :-
महाराष्ट्र राज्यात 58 मोर्चे शांततेत निघाल्यानंतर सुद्धा परत करोडो लोकांचा महामेळावा सराटी अंतर्वली येथे शांततेत पार पडला. मराठा आरक्षणाची मागणी केल्या अनेक दिवसांपासून सुरू आहे. ही धग सतत कायम आहे तरी राज्याचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आम्हाला अधिक वेळ द्या असे म्हणत आहे व वेळ काढू धोरण राबवीत आहे. हा खेळ आपण किती दिवस चालवणार आहात ? असा प्रश्न माजी आमदार प्रकाश पाटील देवसरकर यांनी उपस्थित केला आहे.
मराठा आरक्षणाची मागणी राज्यभर सुरू असून वेगवेगळ्या ग्रामीण भागापर्यंत आंदोलनातून मागणी लावून धरण्यात येत आहे. या आरक्षणासाठी आजपर्यंत कित्येक युवकांनी आत्महत्या केल्या. ह्या कधी थांबवणार आहेत ? युवकांनी उपोषणाचे हत्यार उपसून शासनाकडे मागणी लावून धरली आहे. आंदोलनामध्ये प्रत्येक मराठा बांधव सामील झाला आहे. आजपर्यंत मराठा समाजाने शांततेत अनेक मोर्चे काढून शासनाचे लक्ष वेधले पण शासनाने मराठ्यांच्या मागणीकडे सतत दुर्लक्ष केले आहे.
देशाचे पंतप्रधान देखील एखादी छोटी घटना घडली तरी त्यावर लक्ष ठेवून राज्यांना मार्गदर्शन करीत राहतात पण महाराष्ट्र राज्यात मराठा समाजाच्या एवढ्या महाआंदोलनाची दखल ते का घेत नाहीत ? यामुळे मराठ्यांचा संताप अनावर होत आहे. समाजाच्या या मागणीकडे तातडीने निर्णय घेतला नाही तर शासन व्यवस्था यामुळे कोलमडणार आहे. ही धग वेळीच शांत झाली नाही तर मराठा समाज राज्यकर्त्यांना त्यांची जागा नक्कीच दाखवून देईल. मराठ्यांच्या मागणीकडे नारायण राणे , गुणवंत सदावर्ते, रामदास कदम यांनी आगीत तेल टाकण्याचे काम केले आहे व मराठ्यांच्या भावना सतत दुखावण्याचे कार्य त्यांच्याकडून सुरू आहे. मराठा आंदोलकावर सातत्याने हे गरळ ओकत आहे. यांना शासनाने समज द्यावी व मराठा समाजाची आरक्षणाची मागणी तात्काळ मंजूर करावी असे आवाहन शासनाला माजी आमदार प्रकाशपाटील देवसरकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे