उमरखेड नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव — राजकारणात नवी समीकरणं होण्याची चिन्ह

उमरखेड नगराध्यक्षपद महिलांसाठी राखीव —
राजकारणात नवी समीकरणं होण्याची चिन्ह
उमरखेड : – नगरपरिषदेच्या नगराध्यक्षपदासाठी यंदा खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव निर्णय घेण्यात आला असून, या निर्णयामुळे स्थानिक राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. नगराध्यक्षपदासाठी तयारी करणाऱ्या पुरुष उमेदवारांचा हिरमोड झाला असून, आता “नगराध्यक्षा कोण?” हा प्रश्न शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.
पूर्वी कांता टाक, अरुणा दवणे, विमल रावते, राधा वासमवार, भावना उदावंत, अर्चना नाईक आणि उषा आलट या महिलांनी नगराध्यक्षपद भूषवले आहे. त्यामुळे उमरखेडमध्ये महिला नेतृत्वाची परंपरा असून, या वेळेसही कोणती नवी महिला उमेदवार पुढे येते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
या राखीव निर्णयामुळे भारतीय जनता पक्ष, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेना आणि एआयएमआयएम या पक्षांपुढे नवे गणित निर्माण झाले आहे. काही नेते आपल्या सहधर्मचारिणींना उमेदवारी देण्याची शक्यता व्यक्त होत असून, महायुती आणि महाविकास आघाडीतील भूमिका काय असेल हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.
उमरखेड नगरपरिषदेअंतर्गत २६ नगरसेवक व १३ प्रभाग असून सुमारे संभाव्य ३५ ते ४० हजार अंदाजे मतदार आहेत. महिलांना नेतृत्वाची नवी संधी मिळाल्यामुळे शहरात उत्साहाचे वातावरण आहे. आगामी निवडणुकीत उमरखेडमध्ये “महिला राज” येणार यात शंका नाही.