जरंग तांडा येथील बाळू दत्तात्रय राठोड यांना पीएच.डी. पदवी जाहीर.
- जरंग तांडा येथील बाळू दत्तात्रय राठोड यांना पीएच.डी. पदवी जाहीर
यवतमाळ : जिल्ह्याच्या घाटंजी तालुक्यातील जरंग तांडा ( सेवानगर ) येथील बाळू दत्तात्रय राठोड यांना नुकतीच राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाकडून आंतर विद्याशाखे अंतर्गत असलेल्या शिक्षणशास्त्र विषयातील पीएच.डी. ( डॉक्टरेट ) ही शिक्षणक्षेत्रातील सर्वोच्च पदवी जाहीर झाली आहे. शेतकरी कुटुंबातुन पुढे आलेले बाळू राठोड हे सामाजिक व शैक्षणिक क्षेत्रात कार्यरत आहेत. सामाजिक व ग्रामविकासाच्या कार्यात त्यांनी ‘मुख्यमंत्री ग्रामविकास फेलोशिपच्या’ माध्यमातून उल्लेखनीय कार्य केले आहे. युवकांच्या नेतृत्व विकासाकरिताही त्यांनी नेतृत्व विकास कार्यक्रम विदर्भात सर्वदूर राबविला.
एसएनडीटी महिला विद्यापीठाच्या माजी कुलगुरू तथा नागपूर विद्यापीठाच्या शिक्षणशास्त्र विभागाच्या माजी विभाग प्रमुख डॉ. शशिकला वंजारी यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी ”आदिवासी समाजातील कुमारी मातांची सामाजिक-आर्थिक स्थिती, त्यांच्या पाल्यांच्या शैक्षणिक समस्या, सामाजिक समायोजन व शैक्षणिक अभिवृत्तीचा सहसंबंधात्मक अभ्यास” या ज्वलंत व नाविन्यपूर्ण विषयावर संशोधन कार्य पूर्ण केले. या संशोधनातुन प्राप्त निष्कर्ष व शिफारशींचा कुमारी मातांच्या समस्या सोडविण्याकरिता नक्कीच फायदा होणार आहे.
एका लहानश्या तांड्यातील शेतकरी कुटुंबातील बाळू राठोड यांनी बीएड, एमएड, एमए राज्यशास्त्र व बॅचलर ऑफ जर्नालिजम पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलेले आहे. अवघ्या 35 वर्षाच्या वयात त्यांनी पीएचडी ही शिक्षणक्षेत्रातील सर्वोच्च पदवी प्राप्त केली म्हणून त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे. त्यांनी आपल्या यशाचे श्रेय मार्गदर्शिका डॉ.शशी वंजारी, वडील दत्तात्रय राठोड, आई वच्छलाबाई, सासू-सासरे, पत्नी पूनम, बहीण पूजा, मोठे बंधू, परिवारातील सर्व सदस्य तथा मित्र परिवारास दिले आहे.