तडीपार दोन इसमांवर उमरखेड पोलिसांची कारवाई उमरखेड
तडीपार दोन इसमांवर उमरखेड पोलिसांची कारवाई
उमरखेड : -यवतमाळ जिल्ह्यात तडीपार करण्यात आलेल्या दोन इसमांना उमरखेड पोलीस स्टेशन हद्दीत आढळून आल्याने स्थानिक गुन्हे शाखा, यवतमाळ यांनी त्यांच्यावर कारवाई केली आहे.
जिल्ह्यात अवैध धंदे, अवैध शस्त्र बाळगणे, अवैध उत्खनन तसेच अट्टल गुन्हेगारांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस अधीक्षक कुमार चिंता यांनी दिल्या आहेत. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पथक गुन्हे प्रतिबंधक कारवाई करत असताना १० फेब्रुवारी २०२६ रोजी उमरखेड उपविभागात तडीपार आरोपींचा शोध घेतला.
दुपारी सुमारास ऋतेश तिवारी (वय २४, रा. विडुळ, ता. उमरखेड) हा उमरखेड परिसरात आढळून आला. त्याला उपविभागीय अधिकाऱ्यांनी यापूर्वीच यवतमाळ, नांदेड, हिंगोली व वाशीम जिल्ह्यातून एक वर्षासाठी तडीपार केले होते. तसेच रात्री सुमारे १०.३० वाजता शेख गौस शेख करीम (वय २२, रा. नागापूर रुपाळा, ता. उमरखेड) हा देखील तडीपार आदेशाचे उल्लंघन करून उमरखेड-ढाणकी रोडवरील ब्रिज परिसरात आढळला.
दोन्ही आरोपींनी तडीपार आदेशाचे उल्लंघन केल्याने त्यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता कलम २२३ तसेच महाराष्ट्र पोलीस कायदा कलम ५६ अन्वये उमरखेड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
ही कारवाई पोलीस अधीक्षक कुमार चिंता, अपर पोलीस अधीक्षक अशोक थोरात, उपविभागीय पोलीस अधिकारी हनुमंत गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश चवरे सपोनि धीरज बांडे,पोउनी शरद लोहकरे, यांच्या पथकाने केली.



