पत्रकारांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार होणार मुख्यमंत्र्यांनी दिला शब्द मंगळवारी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या पदाधिकाऱ्यांसोबत होणार बैठक काळ्या फिती लावत आज केली उपोषणाची सांगता
पत्रकारांच्या मागण्यांचा सकारात्मक विचार होणार
मुख्यमंत्र्यांनी दिला शब्द
मंगळवारी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या पदाधिकाऱ्यांसोबत होणार बैठक
काळ्या फिती लावत आज केली उपोषणाची सांगता
नागपूर, ता. १५ :
‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या माध्यमातून राज्यातील पत्रकारांच्या पुढे आलेल्या मागण्या रास्त आहेत. या मागण्यांचा सकारात्मक विचार आम्ही करत असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या प्रमुख शिष्टमंडळाला सांगितले. हे प्रश्न सोडवण्यासाठी आमचा पुढाकार असेल, असा शब्दही यावेळी एकनाथ शिंदे यांनी दिला.
ज्या कारणास्तव नागपूरमध्ये हे उपोषण सुरू झाले होते, ते निश्चितपणे सफल झाले, असे मनोगत राज्याच्या कानाकोपऱ्यातून उपोषणासाठी आलेल्या पत्रकार पदाधिकारी यांनी व्यक्त केले. उपोषणात घेतलेल्या सर्व प्रश्नांवर सविस्तर चर्चा करण्यासाठी मंगळवारी (१९ डिसेंबर) व्हॉईस ऑफ मीडियाच्या प्रमुख शिष्टमंडळासोबत मुख्यमंत्री चर्चा करणार आहेत. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ने पत्रकारांच्या विविध मागण्यांसाठी पुकारलेल्या लाक्षणिक उपोषणाचा आज तिसरा दिवस होता. मुख्यमंत्र्यांचे माध्यम सल्लागार तथा सचिव विनायक पात्रुडकर यांनी पत्रकारांचे हे उपोषण सुटावे यासाठी प्रामुख्याने पुढाकार घेतला. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या मागण्यांबाबत सरकार गंभीर असल्याचे या तीन दिवसात पाहायला मिळाले. तीन दिवसांत अनेक मंत्री, आमदार, खासदार, सामाजिक संघटना, कवी, लेखक यांनी ‘व्हॉईस ऑफ मीडिया’च्या या आंदोलनाला पाठिंबा दिला. आज आमदार शिरीष चौधरी, माजी आमदार राजू तिमांडे, राष्ट्रवादीच्या सक्षणा सलगर, यांच्यासह तेरा आमदारांनी आज उपोषणस्थळी भेट देत आंदोलनाला, उपोषणाला पाठिंबा दिला.
काळ्या फिती बांधून आंदोलन
उपोषणाच्या आजच्या तिसऱ्या दिवशी पत्रकार पदाधिकारी आंदोलनकर्त्यांनी कपाळाला काळ्या फिती बांधत अभिनव आंदोलन केले. आंदोलनादरम्यान दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला. राज्यातून अनेक पत्रकार यात सहभागी झाले होते.
उपोषणाची सांगता
मुख्यमंत्र्यांनी बैठकीची वेळ दिल्यानंतर १३ डिसेंबरपासून सुरू झालेल्या उपोषणाची सांगता आज करण्यात आली. हे आंदोलन पत्रकारांच्या हककासाठी असून जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाहीत तोपर्यंत वेगवेगळ्या मार्गाने आंदोलन सुरू राहणार असल्याचे ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी सांगितले. सकारात्मक पत्रकारितेचा ध्यास व्हॉईस ऑफ मीडियाने घेतला असून ती रुजविण्याचा अट्टहास संघटना करीत असल्याचेही संदीप काळे म्हणाले. समारोपाला उर्दूचे राष्ट्रीय अध्यक्ष मुफ्ती हारून नदवी यांची आवर्जून उपस्थिती होती. राज्य उपाध्यक्ष आनंद आंबेकर यांनी आंदोलनाला प्रत्यक्ष, अप्रत्यक्षरीत्या सहकार्य करणाऱ्या प्रत्येकाचे त्यांनी आभार मानले.
मुख्यमंत्र्यांनी बैठकीची वेळ दिल्यानंतर १३ डिसेंबरपासून सुरू झालेल्या उपोषणाची सांगता आज करण्यात आली. समारोपाचे भाषण करताना ‘व्हॉईस ऑफ मीडिया’चे संस्थापक तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे.