जागतिक पातळीवर पत्रकारितेमध्ये कमालीची अस्वस्थता : संदीप काळे

जागतिक पातळीवर पत्रकारितेमध्ये कमालीची अस्वस्थता : संदीप काळे
व्हॉईस ऑफ मीडियाच्या विदर्भ स्तरिय अधिवेशनाचा थाटात समारोप
संघटनेच्या राज्यकार्याध्यक्ष पदी कुमार कडलक व नरेंद्र देशमुख, तर वर्धा जिल्हा अध्यक्षपदी एकनाथ चौधरी यांची वर्णी.
नागपूर (प्रतिनिधी) :
पत्रकारितेच्या जागतिक पटलावर आज गंभीर अस्वस्थता निर्माण झाली आहे. खोटी बातमी, दिशाभूल करणारे अजेंडे, माध्यमांवरील राजकीय दबाव आणि लोकशाहीच्या मूळ पाया असलेल्या मुक्त पत्रकारितेवर गदा येत असल्याचे चित्र आहे. या सर्व पार्श्वभूमीवर पत्रकारितेतील मूल्यांना पुनश्च जागृत करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन व्हॉईस ऑफ मीडिया आणि व्ही.ओ.एम. इंटरनॅशनल फोरमचे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी सावनेर येथे झालेल्या विदर्भ विभागीय एक दिवसीय अधिवेशनात केले.
कामाक्षी सेलिब्रेशन, पांढुर्णा रोड येथे पार पडलेल्या या अधिवेशनाचे उद्घाटन आमदार डॉ. आशिष देशमुख (सावनेर विधानसभा) यांच्या हस्ते झाले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान व्हॉईस ऑफ मीडिया चे प्रदेशाध्यक्ष अनिलजी मस्के यांनी भूषविले. अधिवेशनाला मुख्य अतिथी म्हणून रामटेकचे खासदार श्यामकुमार बर्वे उपस्थित होते. व्हॉईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष श्रीकृष्ण तणसुखदास चांडक यांची यावेळी उपस्थिती होती. मार्गदर्शक म्हणून मा. संदीपजी काळे यांचे विशेष मार्गदर्शन लाभले.
ज्योतिषी जगविख्यात गुरू जयंत पारधी, विदर्भ अध्यक्ष किशोर कारंजेकर व भोपाल मीडिया संघटनेचे गयाप्रसाद सोनी यांचीही अधिवेशनात प्रमुख उपस्थिती होती.या अधिवेशनात महत्त्वाचा निर्णय घेत प्रदेशाध्यक्ष अनिलजी मस्के यांनी संघटनेच्या राज्यकार्याध्यक्षपदी कुमार कडलक व नरेंद्र देशमुख यांची, तर वर्धा जिल्हा अध्यक्षपदी एकनाथ चौधरी यांची निवड जाहीर केली. या नियुक्त्यांमुळे संघटनेची संघटनात्मक ताकद अधिक भक्कम होईल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.
विदर्भातील अकरा जिल्ह्यांत व्हॉईस ऑफ मीडिया संघटनेचे पदाधिकारी पत्रकार प्रभावीपणे कार्यरत असून पत्रकारांचे संघटन, त्यांचे प्रश्न मांडणे आणि सामाजिक उत्तरदायित्व वाढविण्यासाठी सातत्याने प्रयत्नशील असल्याचे या अधिवेशनात अधोरेखित करण्यात आले. पत्रकारांच्या सुरक्षिततेसह डिजिटल युगातील आव्हाने तसेच ग्रामीण भागातील पत्रकारांची व्यथा यांवर अधिवेशनात सखोल चर्चा झाली. सर्व उपस्थित मान्यवरांची यावेळी भाषणे झाली.
हे अधिवेशन यशस्वी करण्यासाठी दिलीप घोरमारे, राहुल सावजी,सुधाकर बागडे,गिरीश आंदे, सचिन लिडर, विनय वाघमारे,पुरुषोतम नागपूरकर,मनोहर घोळसे, मगेश उराडे, दिनेश चौरशिया,महसूद शेख यांनी परिश्रम घेतले.
आपल्या प्रभावी भाषणात संदीप काळे म्हणाले की, “जगभरातील पत्रकारिता आज मोठ्या अस्वस्थतेच्या टप्प्यावर आहे. पत्रकारितेच्या सत्यनिष्ठा आणि लोकशाहीचे रक्षण करण्यासाठी आपल्याला धाडसाने उभे राहावे लागेल. पत्रकारितेचे सामर्थ्य हे केवळ माहिती देण्यात नाही, तर अन्यायाला आव्हान देण्यात आणि सत्याला आवाज देण्यात आहे. व्हॉईस ऑफ मीडिया संघटना ही पत्रकारांसाठी ढाल बनून उभी आहे आणि विदर्भातील पत्रकारांची एकजूट ही आमची खरी ताकद आहे. आपण सर्वांनी मिळून माध्यमांची विश्वासार्हता परत मिळवली पाहिजे, कारण विश्वास गमावलेल्या पत्रकारितेला समाज मान देणार नाही.”
या अधिवेशनास विदर्भातील दीड हजार पत्रकार बांधवांने उत्स्फूर्त पणे प्रतिसाद मिळाला. समारोपाच्या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी व्हॉईस ऑफ मीडिया च्या कार्याचे कौतुक करत, समाजहितासाठी लढणाऱ्या पत्रकारांना या संघटनेतून कायमचा आधार मिळेल, असा विश्वास व्यक्त केला
फोटो ओळ :
नागपूर सावनेर येथे झालेल्या विदर्भ विभागीय एक दिवसीय अधिवेशनाला प्रचंड प्रतिसाद मिळाला. या अधिवेशनाचे उद्घाटन करताना व्हॉईस ऑफ मीडिया चे आंतरराष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे व मान्यवर.
Hi i think that i saw you visited my web site thus i came to Return the favore I am attempting to find things to improve my web siteI suppose its ok to use some of your ideas