यवतमाळ न.प. ची निसर्ग संवर्धन संदेश रॅली संपन्न . जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांचा जनतेशी थेट संवाद.
यवतमाळ न.प. ची निसर्ग संवर्धन संदेश सायकल रॅली.
जिल्हाधिकारी व पो.अधिक्षकांचा जनतेशी थेट संवाद
यवतमाळ
माझी वसुंधरा अभियान २.० अंतर्गत निसर्ग संवर्धन या उपक्रमाचे अनुषंगाने मा. जिल्हाधिकारी यांचे आदेशानुसार दिनांक १५ एप्रिल रोजी सकाळी ६:०० वाजता यवतमाळ नगर परिषद प्रशासनाचे वतीने आयोजित सायकल रॅली उत्साहवर्धक वातावरणात संपन्न झाली.सदर रॅलीचे उद्घाटक व प्रमुख अतिथी म्हणून सायकलींग करत सहभागी झालेल्या मा. जिल्हाधिकारी श्री अमोल येडगे व जिल्हा पोलिस अधीक्षक श्री दिलीप भुजबळ पाटील यांनी ठिकठिकाणी जनतेशी थेट संवाद साधला.या संदेश सायकल रॅलीत निवासी जिल्हाधिकारी ललित कुमार वऱ्हाडे, उपविभागीय अधिकारी अनिरुद्ध बक्षी, तहसीलदार कुणाल झाल्टे, आदिंची उपस्थिती होती.
या प्रसंगी विविध ठिकाणी नागरिकांशी संवाद साधत मा. जिल्हाधिकारी अमोल येडगे म्हणाले की, दुषीत पर्यावरण संतुलीत व्हावे म्हणून शासन व प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहेच. त्या अनुषंगाने यवतमाळ नगर परिषद कौतुकास्पद काम करितच आहे. परंतु या शहराचे सुज्ञ व जागृत नागरिक म्हणुन नागरिकांचा कृतिशल सहभाग मिळाला तर या प्रयत्नांना “लोकचळवळीचे रुपांतर येईल व स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने राबविण्यात येणाऱ्या या विशेष उपक्रमाला गतिशीलता मिळेल. वृक्षांचे शहर ही संकल्पना मांडताना मा. जिल्हाधिकारी म्हणाले की, यवतमाळकरांनी आपल्या वस्ती-वाड्यात खुल्या जागेत व घरे परिसरासह चौका- चौकात वृक्षांची लागवड करावी ज्यामुळे आपले यवतमाळ शहर हरित वृक्षांचे शहर म्हणुन ओळखले जाईल. शासन राबवित असलेल्या जलशक्ती अभियानाचा संदर्भ देत ते पुढे म्हणाले की, २१ मार्च ते ३० सप्टेंबर २०२२ पर्यंत चालणाऱ्या जलशक्ती अभियानांतर्गत जलस्त्रोत सरंक्षण-संवर्धनातही लोकसहगाची गरज असुन शहरातील तलाव आणि पाणवठे सरंक्षित करण्यास्तव सेवाभावी संस्था- संघटनांनी पुढाकार घ्यावा असे आवाहनही मा. जिल्हाधिकारी यांनी केले.
याप्रसंगी जिल्हा पोलिस अधीक्षक मा. दिलीप भुजबळ पाटील म्हणाले की, जल है तो कल है! अर्थात जल हे जीवन आहे. आपल्याला निसर्ग भरभरुन देतो. आपण निसर्गाला काय देतो? प्रत्येकाने हा विचार करण्याची वेळ आता आली आहे. थेंबे-थेंबे तळे साचे या उक्तीप्रमाणे आपण जल संवर्धन केले पाहिजे. पाणी अडवले पाहिजे पाणी जिरवले पाहिजे. रेनवाॅटर हार्वेस्टिंग चे महत्व जाणले पाहिजे. मा. जिल्हाधिकारी यांनी मांडलेल्या संकल्पनेनुसार आपले शहर वृक्षांचे शहर” झाले पाहिजे. आपल्या यवतमाळ शहराची एकात्मतावादी संस्कृती कौतुकास्पद आहे. सांघिक भावनेतून ईथले लोक एकत्र येऊन काम करतात. याच भावनेने हे विशेष अभियान नक्कीच यशस्वी होईल असा विश्वास मा. जिल्हा पोलिस अधीक्षक यांनी विविध ठिकाणी केलेल्या मार्गदर्शनातुन व्यक्त केला.
सायकल रॅलीच्या समारोप प्रसंगी मुख्याधिकारी माधुरी मडावी यांनी मान्यवरांचे आभार मानले. मा. जिल्हाधिकारी महोदयाकडून वेळोवेळी मार्गदर्शन व उत्साहवर्धक प्रेरणा मिळत असल्याने काम करतांना उर्जा मिळते. आज मा.जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षक महोदयांनी आपला अमुल्य वेळ देवुन उत्साह द्विगुणित केल्याबद्दल त्यांचेप्रती आभार व्यक्त केले. त्याचबरोबर शहरातील सेवाभावी संस्था संघटनांचे प्रतिनिधी म्हणून आयएमए व प्रयासचे डॉ.विजय कावलकर, आयुर्वेद महाविद्यालय अधिष्ठाता डॉ. मुंदाने, संकल्पचे प्रलय टिप्रमवार, क्रिडा भारतीचे दिलीप राखे, सावित्रीज्योती समाजकार्य महाविद्यालयाचे प्रा. घनशाम दरणे, निमा चे डाॅ. राखुंडे, न्यु इंग्लिश हायस्कूलचे देशपांडे सर, अंभ्याकर कन्या शाळा चमु, लोकनायक बापूजी अणे विद्यालय चमु, आदिंचे वेळोवेळी सहकार्य लाभते सोबतच न.प.माध्य शाळा व प्रा. शालेय विद्यार्थी, माझे सर्व विभागप्रमुख व कर्मचारी, शालेय शिक्षक, सफाई कामगार कामाप्रती निष्ठा बाळगुन काम करतात. त्यामुळे न.प. प्रशासनाला गतिशीलता आल्याचे सांगत माझी वसुंधरा अभियान, जलशक्ती अभियान व निसर्ग संवर्धन जनजागृती अभियान सक्षमपणे राबवु असा विश्वास व्यक्त करित मुख्याधिकारी तथा प्रशासक म्हणून माधुरी मडावी यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रकल्प समन्वयक डॉ.विजय अग्रवाल, शालेय प्रशासन अधिकारी निता गावंडे, का.अ. प्रविण उंदरे आदिंनी परिश्रम घेतले.
Your point of view caught my eye and was very interesting. Thanks. I have a question for you.