नगरपरिषदेच्या दुर्लक्षावर प्रहारचा घणाघात – दिव्यांग हक्कासाठी रस्त्यावर लोटांगण”

youtube

नगरपरिषदेच्या दुर्लक्षावर प्रहारचा घणाघात – दिव्यांग हक्कासाठी रस्त्यावर लोटांगण”

उमरखेड
प्रहार जनशक्ती पक्ष आणि प्रहार दिव्यांग क्रांती आंदोलन यांच्या वतीने उमरखेड नगर परिषदेला दिव्यांग धोरण 2018 नुसार 5% निधी देण्याची मागणी करत भर पावसात सलग चार तास लोटांगण आंदोलन करण्यात आले. या आंदोलनात दिव्यांग बांधवांसह पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

महाराष्ट्र राज्य दिव्यांग धोरण 2018 अंतर्गत, परिशिष्ट अ मधील कलम 16(1) नुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांनी त्यांच्या स्वउत्पन्नाच्या किमान पाच टक्के निधी दिव्यांग कल्याणासाठी राखीव ठेवावा, अशी स्पष्ट तरतूद आहे. मात्र, 2018 पासून आजपर्यंत उमरखेड नगर परिषद ही तरतूद फक्त कागदोपत्री दाखवत असून, प्रत्यक्षात दिव्यांगांना तुटपुंजा निधी देऊन त्यांच्या हक्कांवर अन्याय केला जात आहे.

गेल्या चार वर्षांपासून प्रहारच्या कार्यकर्त्यांकडून सातत्याने पत्रव्यवहार, निवेदने व बैठका घेऊनही मुख्याधिकारी निधी वितरित करत नसल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. त्यामुळे संजय गांधी चौक ते नगरपरिषद कार्यालय या दरम्यान लोटांगण करत आंदोलनकर्त्यांनी “आमचा निधी, आमचा हक्क” अशी घोषणाबाजी केली. अखेर मुख्याधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन शांततेत मागे घेण्यात आले.

उमरखेड नगर परिषदचे वार्षिक उत्पन्न सुमारे ३.५ कोटी रुपये आहे. त्यानुसार, 5% म्हणजेच सुमारे १७.५ लाख रुपये दरवर्षी दिव्यांगांसाठी खर्च केले जाणे आवश्यक आहे. पण 2018 पासून आतापर्यंत हा निधी योग्य पद्धतीने न दिल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांकडून करण्यात आला. शहरप्रमुख राहुल मोहितवार यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “जर लवकरात लवकर निधी वाटप केले नाही, तर यापेक्षा तीव्र आंदोलन छेडले जाईल.”

मुख्याधिकाऱ्यांनी निर्णय घेण्यास टाळाटाळ केल्यामुळे वातावरण तणावपूर्ण झाले होते. राहुल मोहितवार यांची प्रकृतीही बिघडली, तर काही आंदोलनकर्ते नगरपरिषद कार्यालयाच्या इमारतीवर चढले, ज्यामुळे परिसरात क्षणभर तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी तात्काळ बंदोबस्त वाढवत परिसराला छावणीचे रूप दिले.

या आंदोलनात शहरप्रमुख राहुल मोहितवार, तालुका प्रमुख सय्यद माजिद, रवी जाधव, प्रदीप आडे, शहर सचिव शाम चेके, प्रजेश खंदारे, रघुनाथ खंदारे, प्रेम रुडे, इरफान, वैध, नेमीचंद चव्हाण, इत्यादींसह अनेक प्रहार कार्यकर्ते आणि दिव्यांग बांधव सहभागी होते.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!