निकृष्ट भोजनाबाबत वस्तीगृहातुनच नितीन भुतडा यांचा थेट सामाजिक न्याय मंत्र्यांना फोन. मुलींच्या वस्तीगृहात शासन निकषांची वानवा. विद्यार्थिनींनी खोलली पोल.

निकृष्ट भोजनाबाबत वस्तीगृहातुनच नितीन भुतडा यांचा थेट सामाजिक न्याय मंत्र्यांना फोन.
मुलींच्या वस्तीगृहात शासन निकषांची वानवा.
विद्यार्थिनींनी खोलली पोल.
उमरखेड प्रतिनिधी-/ उमरखेड स्थित समाज कल्याण विभागाच्या मुलींच्या वस्तीगृहामध्ये मागील अनेक वर्षांपासून भोजन कंत्रादारांकडून उप कंत्राटदार नेमून अवेळी तेही निकृष्ट दर्जाचे भोजन, शासन नियम डावलून दिल्या जात असल्याच्या असंख्य तक्रारी भाजपा यवतमाळ-पुसद जिल्हा समन्वयक नितीन भुतडा व आमदार किसनराव वानखेडे यांना प्राप्त झाल्या होत्या.
त्यावरून दि.13 मार्च रोजी नितिन भुतडा यांनी अंजना नगर येथील आदिवासी मुलींचे वस्तीगृह गाठून विद्यार्थिनींच्या आग्रहास्तव तेथील भोजनाची पाहणी केली असता सकस आहार व पोषकतेचा पूर्णतः बोजवारा वाजवून पैसे कमविण्याच्या दृष्टीने कमी खर्चात विद्यार्थिनींना निकृष्ट भोजन दिल्या जात असल्याची बाब भुतडा यांच्या निदर्शनास अली.
त्यावेळी वसतिगृह अधिक्षिका सौ.एस.एस.राजने यांनी देखील निकृष्ट भोजन व विद्यार्थिनी संदर्भातील इतरही समस्या बाबत समाज कल्याण सहआयुक्त व संबंधितांकडे वारंवार तक्रारी केल्याचे निदर्शनास आले.
एकंदरीत राज्याच्या कंत्राटदाराने जिल्ह्यासाठी तसेच काही निवडक वस्तीगृहांसाठी उप कंत्राटदार नेमून भोजन व्यवस्था चालवित असल्याची धक्कादायक बाब समोर आली. शाळा, महाविद्यालयातुन थकून आलेल्या विद्यार्थिनींना स्वतः स्वयंपाक करावा लागत आहे.त्यामुळे त्यांच्या शैक्षणिक बाबींवर दुष्परिणाम होत असल्याचे देखील दृष्टिपथात आले.
जेवणाबद्दल तक्रार केली असता यवतमाळ येथील महिला उप कंत्राटदार वस्तीगृहातील विद्यार्थिनी तसेच अधिक्षिकेस अर्वाच्य,अश्लील शब्दात बोलत असल्याची कैफियत देखील वसतिगृहातील विद्यार्थिनींनी नितीन भुतडा यांचेसमक्ष मांडली.
त्यावर संतापलेल्या नितीन भुतडा यांनी थेट राज्याचे सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांना भ्रमणध्वनी द्वारे निकृष्ठ भोजन व उप कंत्राटदार पद्धती विषयी सांगितले असता त्यांनी तेथील विद्यार्थिनीशी संवाद साधत कंत्राटदार व विद्यार्थिनींच्या गैरसोयीस कारणीभूत ठरणारी व्यवस्था तात्काळ बदलण्याच्या सूचना समाज कल्याण विभागास दिल्याने अनेक महिन्यांपासून त्रस्त असलेल्या विद्यार्थिनी व अधिक्षिका यांनी सुटकेचा श्वास सोडला.