राष्ट्रीय सेवा योजनेचा आदर्श कार्यक्रम अधिकारी पुरस्कार प्रा. शिवप्रसाद इंगळे यांना प्रदान उमरखेड
राष्ट्रीय सेवा योजनेचा आदर्श कार्यक्रम अधिकारी पुरस्कार प्रा. शिवप्रसाद इंगळे यांना प्रदान
उमरखेड, वार्ताहर
राष्ट्रीय सेवा योजना +२ स्तरचे अमरावती विभागीय शिबिर अमरावती जिल्ह्यात चिखलदरा तालुक्यातील बिहाली येथे संपन्न झाले. या शिबिरामध्ये आदर्श कार्यक्रमाधिकारी पुरस्काराचे वितरण करण्यात आले. यवतमाळ जिल्ह्यातून गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयातील प्रा. शिवप्रसाद इंगळे यांना आदर्श कार्यक्रम अधिकारी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
प्रा. शिवप्रसाद इंगळे यांनी गावंडे कनिष्ठ महाविद्यालयात मागील चार वर्षांपासून राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी म्हणून उत्कृष्ट कार्य करताना बिटरगाव (खुर्द) येथे संपन्न झालेल्या ७ दिवशीय विशेष शिबिरात आरोग्य तपासणी शिबिर व मोफत औषधी वाटप, १५० रोपांची लागवड, पशू चिकित्सा व मोफत औषधी वाटप, बंधारा बांधणे हे उपक्रम राबवले.
गावंडे महाविद्यालयात आयोजित प्लॅस्टिक मुक्त अभियानांतर्गत राबवलेल्या या विभागीय शिबिरात ३५० ते ४०० वेगवेगळ्या महाविद्यालयातील कार्यक्रम अधिकारी आणि विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते. या शिबिरात तीन हजार सीड बॉल बनविण्यात आले. सोबतच प्रा. इंगळे यांनी उमरखेड येथील तहसील कार्यालय व नगरपालिकेच्या सूचनेनुसार विविध कार्यक्रमांचे आयोजन केले होते. या सर्व कार्याची दखल घेऊन त्यांना आदर्श कार्यक्रम अधिकारी पुरस्कार प्रदान करण्यात आला.
या यशाबद्दल यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे अध्यक्ष राम देवसरकर, सचिव डॉ. यादवराव राऊत, सर्व पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. माधवराव कदम, कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा. बालाजी लाभसेटवार, पर्यवेक्षक प्रा. गणेश जाधव, सर्व सहकारी प्राध्यापक व कार्यालयीन कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.



