शेतकऱ्यांना जगवायचे असेल तर सरकारने ठोस मदत करावी; अन्यथा रस्त्यावरची लढाई लढू – रोहित पवार
शेतकऱ्यांना जगवायचे असेल तर सरकारने ठोस मदत करावी; अन्यथा रस्त्यावरची लढाई लढू – रोहित पवार
*उमरखेडमध्ये शेतकरी व आत्महत्याग्रस्त कुटुंबीयांशी साधला संवाद; विदर्भातील तीन महिन्यांत ४१५ शेतकरी आत्महत्या झाल्याचा दावा**
उमरखेड :- शेतकऱ्यांचे वाढते उत्पादन खर्च, नैसर्गिक आपत्तीमुळे झालेले नुकसान, रखडलेली कर्जमाफी आणि आर्थिक संकटामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. शेतकरी आणि शेतमजुरांना जगवायचे असेल तर सरकारने केवळ आश्वासने न देता हेक्टरी एक लाख रुपयांची मदत, कर्जमाफी आणि जनावरांच्या चारा-पाण्याची व्यवस्था करावी; अन्यथा शेतकरी, शेतमजूर आणि युवकांना सोबत घेऊन रस्त्यावरची लढाई लढावी लागेल, असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी दिला.
शुक्रवारी (दि. ६ नोव्हेंबर) यवतमाळ जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले असता उमरखेड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात त्यांनी शेतकरी बांधव आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबीयांशी संवाद साधला. यावेळी बोलताना त्यांनी शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटावरून सरकारला धारेवर धरले. गेल्या दहा वर्षांत उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला; मात्र सोयाबीनला अपेक्षित भाव मिळाला नाही. त्यात अतिवृष्टी व पीक नुकसानीची भर पडल्याने शेतकऱ्यांसमोर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाल्याचे ते म्हणाले.
राज्यातील ५५ लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणे अपेक्षित असताना अद्याप अनेक शेतकरी वंचित असल्याचा दावा त्यांनी केला. तसेच पीकविमा, अतिवृष्टी मदत आणि शेतमजूर कुटुंबांना आर्थिक सहाय्य देण्याची मागणी केली. विदर्भातील यवतमाळ, अकोला, अमरावती, बुलढाणा व वाशिम या पाच जिल्ह्यांत तीन महिन्यांत ४१५ शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याचे सांगत, त्यापैकी यवतमाळ जिल्ह्यात १२८ आत्महत्या झाल्याचा आकडा त्यांनी मांडला. शेतकऱ्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलू नये, संकटाविरुद्ध संघटितपणे लढावे, असे आवाहनही त्यांनी केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष वर्षा निकम, चंद्रशेखर जयस्वाल, भास्कर पंडागळे, प्रदीप देवसरकर, महाविकास आघाडीचे नेते व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक स्वप्नील कनवाळे यांनी केले.

