सहस्त्रकुंडात अडकलेल्या सात पर्यटकांना जिवदान नितीन भुतडा यांची शिष्टाई फळाला उमरखेड –
सहस्त्रकुंडात अडकलेल्या सात पर्यटकांना जिवदान
नितीन भुतडा यांची शिष्टाई फळाला
उमरखेड –
उमरखेड तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटनस्थळ सहस्रकुंड येथे पर्यटनासाठी आलेले ७ पर्यटक नदीपात्रात अडकून पडले होते. भाजपा जिल्हा समन्वयक श्री नितीनभाऊ भुतडा यांना या प्रकाराची माहिती मिळताच त्यांनी तातडीने सुत्र हलविले. आणि सर्व पर्यटकांना सुखरूप बाहेर काढले. ज्यामुळे सर्व सातही पर्यटकांना जिवदान मिळाले.
विदर्भ मराठवाड्यात प्रसिद्ध असलेल्या सहस्त्रकुंड येथे आज अचानक आलेल्या पाण्यामुळे 7 पर्यटकांना संकटाचा सामना करावा लागला. मुरली डॅम मधून पाण्याचा विसर्ग अचानक वाढल्याने नदीपात्रात आलेल्या जोरदार प्रवाहामुळे सात पर्यटक पाण्यात अडकले. यापैकी दोघांनी स्वतःहून बाहेर पडण्याचा प्रयत्न केला, मात्र पाच जण पाण्याचे रौद्ररूप पाहून आतमध्येच अडकून पडले.
पर्यटक अडकल्याचे भीषण दृश्य पाहताच, पंचायत समितीचे माजी सदस्य धनराज तगरे यांनी प्रसंगावधान राखत तात्काळ सामाजिक कार्यात नेहमी अग्रेसर असणारे नितीनभाऊ भूतडा यांना फोन करून या गंभीर घटनेची माहिती दिली.
नितीनभाऊ भूतडा यांनी या माहितीची तात्काळ दखल घेतली. त्यांनी क्षणाचाही विलंब न लावता परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन, तात्काळ उप विभागीय अधिकारी सखाराम मुळे यांना माहिती दिली. त्यांनी देखील तत्काळ तहसीलदार सुरडकर यांना घटनास्थळी रवाना होण्याचे निर्देश दिले. त्याचबरोबर, नितीन भुतडा यांनी नांदेड जिल्हाधिकारी यांना बोलून तिथून प्रशिक्षित आपत्ती व्यवस्थापन (SDRF) रेस्क्यू टीमला तातडीने बोलावून घेतले.
तहसीलदार उमरखेड यांच्या नेतृत्वाखालील महसूल आणि पोलिस पथक तत्काळ घटनास्थळी पोहोचले. स्थानिक मासेमारी करणारे तरुण, आणि महसूल व पोलिस अधिकारी यांनी एकत्र येऊन समन्वय साधला. पाण्याच्या वाढलेल्या दाबामध्येही जीवावर उदार होऊन या संयुक्त बचाव पथकाने अतिशय कौशल्याने आणि धैर्याने पाण्यात अडकलेल्या ५ महिला पर्यटकांना सुरक्षितपणे बाहेर काढले.
या संयुक्त रेस्क्यू ऑपरेशनमध्ये सर्व पर्यटक सुखरूप बचावले असून, कोणतीही जीवितहानी झाली नाही.
नितीनभाऊ भूतडा यांनी दाखवलेली तत्परता, संवेदनशीलता आणि परिणामकारक समन्वय यामुळे ही मोठी दुर्घटना टळली. या यशस्वी बचावकार्यामुळे उमरखेड परिसरात नितीनभाऊ भूतडा यांच्यावर आणि त्यांच्या एका हाकेवर धावून आलेल्या सर्व शासकीय अधिकारी, स्थानिक रेस्क्यू टीम आणि स्थानिक नागरिकांवर कौतुकाचा वर्षाव होत आहे. संकटात मदतीसाठी धावणारे नेते अशी त्यांची प्रतिमा यामुळे अधिकच दृढ झाली आहे.



