सततच्या लाईन ट्रीपिंग मुळे ढाणकीकर हैराण.
सततच्या लाईन ट्रीपिंग मुळे ढाणकीकर हैराण
ढाणकी
ढाणकी शहरात दररोज दिवसा व रात्रीच्या वेळी होणारी सततची लाईन ट्रीपिंग यामुळे ढाणकीकर त्रस्त आहेत. महावितरणचे कर्मचारी मात्र शहरात बाकी असलेल्या विज बिलधारकांकडून, बिल वसुली करण्यात व्यस्त आहेत.
नियम डावलून विज बिल न भरलेल्यांचे कनेक्शन , कुठलीही पूर्वसुचना, नोटीस न देता महावितरण कर्मचारी कापत असल्याची चर्चा आहे. शहरात सतत होणाऱ्या लाईन ट्रीपिंग मुळे त्रस्त असलेल्या नागरिकांना, यापासून दिलासा देण्यात मात्र हे अधिकारी, कर्मचारी कसूर करताना दिसून येत आहेत. सततच्या लाईन ट्रीपिंग मुळे नागरिकांच्या घरात चालू असलेली मोठमोठी उपकरणे उदा.टीव्ही , फ्रिज, एसी , वॉशिंग मशीन , फॅन , कुलर अचानक होणाऱ्या ट्रिपिंग मुळे उडण्याची दाट शक्यता आहे. बऱ्याच जणांचे अनेक उपकरण सततच्या लाईन ट्रीपिंग मुळे बिघडली सुद्धा आहेत. परंतु याचे महावितरण ला काही घेणे देणे नसल्याचे दिसत आहे.
त्यांना फक्त वसुली एके वसुली एवढेच दिसत आहे. ज्याप्रमाणे वीज वसुली सक्तीने होत आहे, त्याप्रमाणे वीज ग्राहकांना वीजही सुरळीत मिळाली पाहिजे. असा सूर सामान्य नागरिकातून निघत आहे. तसेच पैसेवाल्यांच्या घरचे कनेक्शन अचानकपणे न कापता त्यांना मुभा दिली जाते व गोरगरिबांना मात्र कुठलीही मुभा न देता, नोटीस न देता त्यांचे कनेक्शन कापल्या जाते. असा प्रकार सध्या ढाणकी शहरात महावितरण तर्फे चालू असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे.
सततच्या होणाऱ्या लाईन ट्रीपिंगच्या त्रासापासून ढाणकीकरांना कधी दिलासा मिळणार ? कधी महावितरण आपल्या कर्तव्याप्रति जागरूक होऊन ढाणकीकरांना सुरळीत वीज वितरण करणार ? असा प्रश्न निर्माण होत आहे.