कठोर परिश्रम व आई, वडील आणि बहिणीच्या प्रेरणेमुळे मी घडलो – डॉ. अतुल गावंडे
कठोर परिश्रम व आई, वडील आणि बहिणीच्या प्रेरणेमुळे मी घडलो
– डॉ. अतुल गावंडे
उमरखेड, दि. २३ (वार्ताहर)
कठोर परिश्रम व आई, वडील आणि बहिणीच्या प्रेरणेमुळे मी घडलो, असे प्रतिपादन मूळ महागाव तालुक्यातील उटी येथील व सध्या अमेरिकेत वास्तव्यास असलेले डॉ. अतुल गावंडे यांनी केले. येथील गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयात विद्यार्थ्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे अध्यक्ष राम देवसरकर या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. संस्थेचे सचिव डॉ. यादवराव राऊत, प्राचार्य डॉ. माधवराव कदम व्यासपीठावर उपस्थित होते.
महाविद्यालयाचे संजीवक कै. डॉ. आत्मारामजी गावंडे यांनी या महाविद्यालयास आपले तिसरे अपत्य मानले होते, त्या नात्याने डॉ. अतुल गावंडे आपल्या या भावंडाची अमेरिकेत राहूनही काळजी घेत असतात. आठ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीनंतर डॉ. अतुल गावंडे सध्या गावंडे महाविद्यालयात आले आहेत. आपल्या कामात व्यस्त असूनही त्यांनी तीन दिवसांचा वेळ आपल्या या भावंडासाठी दिला होता.
महाविद्यालयाच्या जिन ॲंड गार्नेट एंगल श्रोतृगृह, डॉ. आत्मारामजी गावंडे स्मृती सभागृहाच्या नूतनीकरणाचे उद्घाटन, विद्यार्थी, प्राध्यापक, कर्मचाऱ्यांसाठी पिण्याच्या शुद्ध पाण्याचा शुद्धीकरण संच आणि नव्यानेच बांधकाम कलेल्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या अभ्यासकेंद्र इमारतीचे उद्घाटन डॉ. अतुल गावंडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाले.
संस्थेचे सचिव डॉ. यादवराव राऊत यांनी मनोगत व्यक्त केले. संस्थेचे अध्यक्ष राम देवसरकर यांनी अध्यक्षीय भाषणातून डॉ. अतुल गावंडे यांनी दिल्ली येथील एम्स आणि गावंडे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांशीच ते संवाद साधत असल्याचा आवर्जून उल्लेख केला. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ विद्यार्थ्यांनी घ्यावा,असेही सुचविले. विद्यार्थी संवाद कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. डॉ. कुंतल बोंपिलवार, प्रा. डॉ. वसुंधरा शिंदे व प्रा. डॉ. सविता धोंगडे यांनी केले तर आभार प्रा. डॉ. सविता धोंगडे यांनी मानले.