स्त्रियांचा सन्मान करणारे लोक कल्याणकारी राजे छत्रपती श्री शिवाजी महाराज -प्राचार्य संगीताताई पुडे.

youtube

स्त्रियांचा सन्मान करणारे लोककल्याणकारी
राजे शछत्रपती श्री शिवाजी महाराज -प्राचार्य संगीताताई पुंडे

दर्यापुर…

महाराष्ट्राच्या पुणे जिल्ह्यात शिवनेरी किल्ल्यावर 19 फेब्रुवारी 1630 च्या सूर्यास्ताला माता जिजाऊ च्या पोटी एका प्रखर तेजस्वी सूर्याचा जन्म झाला. तेच छत्रपती शिवाजी राजे! आज जवळपास साडेतीनशे वर्षानंतरही छत्रपती शिवरायांचे नाव जरी घेतले तरी संपूर्ण परिसर दणाणून जातो. त्यांचा रोमांचकारी इतिहास आठवला की, अंगावर शहारे येतात एवढा उत्तुंग पराक्रम, जाज्वल्य देशभक्ती आणि प्रखर स्वाभिमानाने नसानसांत भिनलेली स्वराज्यनिष्ठा या सर्व गोष्टींमुळे संपूर्ण भारतीयच नव्हे तर संपूर्ण जगात छत्रपतीं शिवरायांचे नाव मोठ्या आदराने घेतले जाते.  स्वराज्य व्हावे ही श्रीं ची ईच्छा”या संकल्पनेचा जन्म पुणे जहागिरीतच झाला. भोर तालुक्यातील रोहिडे खेड्यातील सह्याद्रीच्या शिखरावरील झाडीत रायरेश्वराच्या परिसरात बाल शिवाजी ने आपल्या सवंगड्यांना घेऊन स्वराज्य संकल्पनेचा प्रथम उच्चार केला, त्यावेळी छत्रपती शिवरायांचे वय अवघ्या 14 वर्षाचे होते. स्वराज्याची बांधणी करतानाच लहान असो वा मोठा, स्त्री असो वा पुरूष सर्वांनाच समान न्याय मिळावा, हे स्वराज्याचे धोरण त्यांनी ठरवले होते.
छत्रपती शिवरायांच्या बालमनावर हे संस्कार रुजविणार्‍या थोर माता जिजाऊ ह्या वास्‍तविक अर्थाने स्वराज्याच्या खऱ्या संकल्पिका ठरतात. इथूनच स्वराज्याची तोरणमाळ विणली गेली आणि महाराष्ट्र धर्म जन्माला आला. खरी आईची महती ही माता जिजाऊ च्या कार्यातून दिसून येते. जिजाऊंचे कार्य दीपस्तंभासारखे होते. त्या केवळ एक महिला किंवा आई म्हणून जगल्या नाहीत तर त्यांनी सामाजिक दायित्वाची भूमिकाही पार पाडली आणि भारतीय महिलांच्या कर्तुत्वाची परंपरा उत्तुंग शिखरावर नेऊन पोहोचवली म्हणून प्रत्येक आईने आज स्वतःला जिजाऊच्या भूमिकेत पाहिले पाहिजे आणि येणारी पिढी संस्कारक्षम घडविण्यासाठी झटले पाहिजे. तेव्हाच स्त्रियांवर होणारे अन्याय व अत्याचार दूर होतील. छत्रपती शिवरायांचा स्त्री विषयक दृष्टिकोन जरा अभ्यासा..
मनूने शुद्र ठरवलेल्या स्त्रियांना छत्रपती शिवरायांच्या कारकिर्दीत सन्मानाची व न्यायाची वागणूक मिळाली होती शिवरायांनी आपल्या वर्तन व कृतीतून स्त्री विषयक जो आदरभाव बाळगला होता आणि परस्त्री संदर्भात जो आदर्श मांडला होता तो समस्त मानव जातीला प्रेरणादायी ठरावा असा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना स्त्रियांबद्दल प्रचंड आदर होता, तसे संस्कार जिजाऊंनी त्यांच्यावर केले होते आणि तो आदर छत्रपती शिवराय प्रत्यक्ष व्यवहारातही उतरवत असत. यावर शत्रूंचाही अधिक विश्वास होता.
*छत्रपती शिवाजी महाराजांनी जेव्हा सुरतेवर छापा घातला तेव्हा तिथले काही लोक स्त्रियांचा वेश घेऊन पळून जाऊ लागले. याचे कारण असे होते की, त्यांना माहित होते की, छत्रपतींचे मावळे स्त्रियांना सुखरूप जाऊ देतात, त्यांना त्रास देत नाहीत, किंवा पकडत नाहीत. असा त्यांचा लौकिक आणि दरारा शत्रु मध्येही दिसून येतो. त्यांच्या न्यायबुध्दीवर, तत्त्व, शीलता व चारित्र्यसंपन्नतेवर एवढा मोठा विश्‍वास शत्रूंचा दिसून येतो. परस्त्रीचा आदर केला जावा, तसे न घडल्यास शासन केले जाईल, असे सक्तीचे आदेश राजांनी त्यावेळी काढले होते त्यामुळे युद्धात विजय प्राप्त केलेल्या कुठल्याही प्रदेशातील स्त्रियांना शिवरायांचे सैन्य आदराची व सन्मानाची वागणूक देत असे. तरीदेखील आबाजी सोनदेव या सरदाराने कल्याण काबीज केल्यानंतर कल्याणच्या सुभेदाराची सून राजांना नजर करून राजांकडून बक्षीस मिळावे या घाणेरड्या भावनेतून प्रयत्न केला. मात्र त्यावर छत्रपतींनी सरदाराला कडक बजावले व कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेला साडी, चोळी व अलंकार इ. देऊन सन्मानाने परत पाठवले. छत्रपती शिवरायांनी स्त्रियांच्या सन्मानाला अग्रस्थानी मानले. त्यामुळेच शत्रुच्या मूलखातून सुद्धा स्त्रियांना कैद करून आणण्याची परवानगी त्यांनी सैन्यांना नाकारली होती. तशा सूचना आणि शासन सुद्धा केलेले होते. स्त्रियांना उपभोगाची व करमणुकीची वस्तू मानायची नाही, सैन्याचा दृष्टिकोन सुद्धा स्त्रियांकडे पाहण्याचा सन्मानपूर्वक असावा, असे कडक निर्बंध घालून दिलेले होते आणि म्हणूनच रयतेतल्या स्त्रिया महाराजांना पुजायच्या. कल्याणच्या सुभेदाराची सून, गोडेवाडीकराची सून, किंवा बेलवाडीची ठाणेदारीन, या सर्व प्रकरणांतून छत्रपती शिवाजी महाराजांचा स्त्रीविषयक दृष्टिकोन स्पष्ट होतो. स्त्री ही शत्रूची असो वा आपली, तिला मानसन्मान दिलाच पाहिजे अशी छत्रपती शिवरायांची आज्ञा होती अशा या प्रजाहितदक्ष, लोककल्याणकारी श्रीमंतयोगी छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे ध्येयधोरण जोपासले होते. छत्रपती शिवाजी राजांच्या या स्त्रीविषयक समतावादी दृष्टिकोनामुळे येसूबाई, ताराराणी, उमाबाई दाभाडे , थोर राजमाता अहिल्यादेवी होळकर अशा कर्तृत्ववान स्त्रिया मराठेशाहीमध्ये आपला ठसा उमटवून गेल्या.
छत्रपती शिवरायांनी स्वाभिमानाने ओथंबलेली संपूर्ण पिढी तयार केली होती. त्या पिढीने आणि स्वतः शिवरायांनी जो पराक्रम केला व इतिहास घडवला, तो दैदिप्यमान असा होता. त्याला जगात कुठेच तोड नाही. सर्व सामान्यातील सामान्य माणसाचे, गोरगरीब, कष्टकरी प्रजेचे, बारा मावळ रयतेचे कल्याण व संरक्षण हेच छत्रपती शिवरायांच्या राज्यव्यवस्थेचे सूत्र असल्यामुळे हिंदुस्तानच्या इतिहासात “रयतेचा राजा ” म्हणून छत्रपती शिवरायांची प्रतिमा प्रत्येक लहान मोठ्यांच्या मनामनात रुजली गेली आहे. असे हिंदुस्थानच्या इतिहासातील पहिले सार्वभौम लोककल्याणकारी राजे म्हणजेच छत्रपती शिवाजी महाराज होत. शेवटी एवढंच म्हणावसं वाटतं:
अंधार फार झाला एक दिवा पाहिजे
महाराष्ट्राच्या या मातीला
फक्त जिजाऊंचा शिवबा पाहिजे
आज शिवजयंतीनिमित्त तमाम शिवभक्तांना शिवजयंतीच्या खुप खुप शुभेच्छा..! जय महाराष्ट्र, जय जिजाऊ , जय शिवराय

प्राचार्या संगीताताई पुंडे
अध्यक्षा : राजमाता अहिल्याबाई होळकर मल्टीपर्पज डेव्हलपमेंट सोसायटी दर्यापूर
सहसचिव: धनगर प्राध्यापक महासंघ (म. रा.)
*जिल्हा* *उपाध्यक्षा* :- शिक्षक आघाडी अमरावती विभाग
*संचालिका* : स्कॉलर डिजीटल इंग्लिश मिडीयम स्कूल

Google Ad
Google Ad

1 thought on “स्त्रियांचा सन्मान करणारे लोक कल्याणकारी राजे छत्रपती श्री शिवाजी महाराज -प्राचार्य संगीताताई पुडे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!