गावंडे महाविद्यालयाचा विकास करून परमोच्च बिंदूवर नेण्याचे काम डॉ. राऊत यांनी केले – राम देवसरकर
गावंडे महाविद्यालयाचा विकास करून परमोच्च बिंदूवर नेण्याचे काम डॉ. राऊत यांनी केले
– राम देवसरकर
उमरखेड दि. ५
गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयाचा विकास करून परमोच्चबिंदूवर नेण्याचे काम डॉ. यादवराव राऊत यांनी केले, असे प्रतिपादन यवतमाळ जिल्हा अखिल कुणबी समाज संस्थेचे अध्यक्ष व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाचे सिनेट सदस्य राम देवसरकर यांनी केले.
ते येथील गोपिकाबाई सीताराम गावंडे महाविद्यालयात आयोजित कर्मयोगी शिक्षणमहर्षी रोटेरियन डॉ यादवराव राऊत यांच्या सहस्त्रचंद्र दर्शन सोहळ्यात अध्यक्षपदावरून बोलत होते.
या गौरव सोहळ्यास डॉ. यादवराव राऊत, डॉ. सौ. विमलताई राऊत, अमेरिका निवासी डॉ. सुशीलाताई गावंडे, ॲड सुमिताताई गावंडे, रोटेरियन डॉ. सतीश सुळे, रोटेरियन राजे संग्रामसिंह भोसले, संस्थेचे उपाध्यक्ष संभाजी नरवाडे, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ माधवराव कदम यांची व्यासपीठावर उपस्थिती होती.
आपल्या अध्यक्षीय भाषणात राम देवसरकर यांनी डॉ. राऊत यांच्या कार्य – कर्तृत्वाचा आढावा घेतला. डॉ. राऊत हे रुग्णसेवा करून, रोटरीच्या माध्यमातून समाजसेवा करीत असताना व्यस्त असूनही महाविद्यालयात रोज येतात आणि महाविद्यालयाच्या सर्वांगीण विकासात आपले योगदान देत असतात. डॉ. राऊत या माझ्या मामांकडून मी खूप काही शिकलो आहे आणि सतत त्यांचे नेहमीच मार्गदर्शन मिळत असते. असा आवर्जून उल्लेख केला.
डॉ सुशीला गावंडे, ॲड सुमिता गावंडे यांनीही याप्रसंगी आपले गौरवपर मनोगत व्यक्त केले. डॉ . सुशीलाताई गावंडे यांनी डॉ. राऊत यांच्यासह शिक्षण व समाज कार्य करतानाच्या आठवणींना उजाळा देऊन त्यांनी महाविद्यालयाच्या विकासासाठी केलेल्या कार्याचा गौरव केला. टेबल टेनिसच्या खेळासाठी त्यांनी देणगी संस्थेकडे सुपूर्द केली. यावेळी ॲड. सुमिता गावंडे यांनीही डॉ . राऊत यांच्या कार्याचा गौरव केला. त्या म्हणाल्या की, तुम्ही माझ्यासाठी दीपस्तंभासारखे आहात. भारतीय संस्कृती व परंपरांची ओळख मला डॉ विमलताई राऊत यांनी करून दिली. संस्थेचे माजी अध्यक्ष लोकनेते ॲड कै. अनंतरावजी देवसरकर आणि माझे वडील कै. डॉ . आत्माराम गावंडे यांच्यासह तुम्ही खांद्याला खांदा लावून अनेक प्रकल्प राबविले. तुमच्याशिवाय येथे आमच्या जीवनाला अर्थ राहिला नसता असेही त्या म्हणाल्या. यावेळी डॉ अतुल गावंडे यांचा अमेरिकेहून व्हिडिओद्वारे संदेश सादर करण्यात आला. ते आपल्या संदेशात म्हणाले की, १९७० पासून डॉ. राऊत यांचा सहवास येथील प्रत्येक घटकांसाठी सहानुभूती व्यक्त करणारा असल्याचे मत व्यक्त केले.
राऊत कुटुंबीयांच्यावतीने मनोगत व्यक्त करताना, साक्षी जुमडे यांनी, ते आमचे सर्वस्व असल्याचे प्रतिपादन करून सहानुभूतीपूर्वक व सन्मानाने मदत केली असल्याचे उद्गार व्यक्त केले. त्यांच्यामुळेच मी आज इथे उभी असल्याची भावना त्यांनी यावेळी व्यक्त केली. संस्थेचे उपाध्यक्ष संभाजी नरवाडे यांनी डॉ. राऊत यांच्यासोबतच्या बालपणीच्या सहशिक्षणाच्या आठवणी सांगितल्या. त्यांनी केलेल्या वैद्यकीय, सामाजिक, शैक्षणिक कार्याचा गौरव केला.
रोटेरियन डॉ. संग्रामसिंह भोसले यांनी डॉ. राऊत यांनी रोटरीच्या माध्यमातून परिसरात केलेल्या सामाजिक कार्याचा उल्लेख केला व या कार्याची पावती म्हणूनच डॉ. राऊत यांना रोटरीतील सर्वोच्च मानला गेलेला ‘सर्विस अबोव्ह सेल्फ” हा पुरस्कार मिळाला, असे गौरवोद्गार काढले.
रोटेरियन डॉ. सतीश सुळे यांनी आपल्या भाषणातून डॉ. राऊत यांचा गौरव केला. ते म्हणाले की, प्रवाहाबरोबर चालणारी माणसे तर अनेक आहेत परंतु प्रवाह बदलून सकारात्मक विचार करणारे व धडपडी वृत्तीचा ध्यास असणारी डॉ . राऊत यांच्यासारखी माणसे नेहमीच कर्माला व कर्तृत्वाला प्राधान्य देतात. खरोखरच कर्मयोगी व शिक्षण महर्षी या पदाला न्याय देणारे त्यांचे व्यक्तिमत्त्व आहे.
आपल्या सत्काराला उत्तर देताना शिक्षण महर्षी, कर्मयोगी, रोटेरियन डॉ. राऊत हे भावूक झाले आणि त्यांनी आजपर्यंतचा त्यांचा प्रवास कथन केला. महाविद्यालयाच्या जडणघडणीमध्ये संस्थेचे माजी अध्यक्ष व लोकनेते कै. ॲड. अनंतराव देवसरकर व कै. डॉ. आत्माराम गावंडे यांचे मार्गदर्शन मिळाले. धर्मपत्नी डॉ. विमल राऊत यांची मोलाची साथ मिळाल्यामुळेच मी सामाजिक, शैक्षणिक आणि वैद्यकीय क्षेत्रात एवढे मोठे कार्य करू शकलो असे नम्रपणे नमूद करून त्यांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त केली.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ माधवराव कदम यांनी केले. प्रा. अभय जोशी यांनी मानपत्राचे वाचन केले. या सोहळ्याचे संचालन डॉ. धनराज तायडे, डॉ. कुंतल बोंपिलवार, प्रा. प्रवीण नखाते यांनी केले. तर आभार प्रा.अभय जोशी यांनी मानले. त्यांनी गायलेल्या पसायदानंतर सोहळ्याची सांगता झाली