नांदेडमध्ये फुफ्फुसापर्यंत पोहोचलेली मज्जारज्जूची गाठ यशस्वीपणे काढली! दोन आठवड्यांत ५० वर्षीय महिला स्वतःच्या पायावर चालत आली; डॉ. मयुरेश रामपूरकर यांच्या नेतृत्वाखाली गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी
नांदेडमध्ये फुफ्फुसापर्यंत पोहोचलेली मज्जारज्जूची गाठ यशस्वीपणे काढली!
दोन आठवड्यांत ५० वर्षीय महिला स्वतःच्या पायावर चालत आली; डॉ. मयुरेश रामपूरकर यांच्या नेतृत्वाखाली गुंतागुंतीची शस्त्रक्रिया यशस्वी
नांदेड : पाठीच्या मणक्यातून सुरू होऊन फुफ्फुसापर्यंत पोहोचलेल्या अत्यंत गुंतागुंतीच्या गाठीवर नांदेडमध्ये यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली. तुकामाई हॉस्पिटलचे स्पाईन सर्जन डॉ. मयुरेश मिलिंद रामपूरकर यांच्या नेतृत्वाखाली ही शस्त्रक्रिया पार पडली. विशेष म्हणजे, शस्त्रक्रियेनंतर अवघ्या दोन आठवड्यांत संबंधित ५० वर्षीय महिला कोणाचाही आधार न घेता स्वतःच्या पायावर चालत टाके काढण्यासाठी रुग्णालयात आली.
सदर महिला अनेक दिवसांपासून पाठीच्या व पायाच्या तीव्र वेदनांनी त्रस्त होती. कालांतराने तिचे चालणेही बंद झाले होते. तपासण्यांमध्ये पाठीच्या तिसऱ्या मणक्याजवळून (D3) निघालेली मोठी गाठ मणक्याला बाधित करून छातीच्या पोकळीतून फुफ्फुसापर्यंत पोहोचल्याचे आढळून आले. मज्जारज्जूवरील नसांवर मोठा दबाव निर्माण झाल्याने पायांमध्ये जडपणा, सुन्नपणा आणि वेदना वाढल्या होत्या. कूस बदलणेही रुग्णासाठी त्रासदायक झाले होते.
गाठ कर्करोगाची असण्याची शक्यता असल्याने रुग्णाने अनेक ठिकाणी उपचारासाठी धाव घेतली. PET स्कॅनसह विविध तपासण्या करण्यात आल्या. गाठ फुफ्फुसापर्यंत पोहोचल्याने कार्डिओथोरासिक सर्जनचीही आवश्यकता भासणार होती. गुंतागुंतीची व दुर्मीळ स्वरूपाची गाठ असल्याने मुंबई किंवा हैदराबाद येथे जाण्याचा सल्लाही देण्यात आला होता.
दरम्यान, ऑन्कोसर्जन डॉ. अविनाश गायकवाड यांनी रुग्णाची तपासणी करून योग्य निदान केले आणि पुढील उपचारासाठी डॉ. मयुरेश रामपूरकर यांच्याकडे पाठविले. सर्व अहवालांचा अभ्यास करून डॉ. रामपूरकर यांनी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. संभाव्य धोके रुग्णाच्या नातेवाईकांना समजावून सांगून त्यांच्या संमतीनंतर शस्त्रक्रियेची तयारी करण्यात आली.
शस्त्रक्रियेदरम्यान खराब झालेल्या तिसऱ्या मणक्यासह वरचे व खालचे मणके स्क्रू व रॉडच्या साहाय्याने स्थिर करण्यात आले. त्यानंतर गाठ मज्जारज्जूच्या नसांपासून काळजीपूर्वक विलग करण्यात आली. मणक्याचा व उजव्या बाजूच्या फासळीचा आवश्यक भाग काढून फुफ्फुसात गेलेला गाठीचा भागही पूर्णपणे वेगळा करून काढण्यात आला.
ही D2-D3-D4 pedicle screw fixation with laminectomy आणि D3 right costo-transversectomy with excision of tumor with intrathoracic extension स्वरूपाची अत्यंत गुंतागुंतीची शस्त्रक्रिया होती.
या शस्त्रक्रियेत श्री. सुंदर परदेशी यांनी सहकार्य केले. भूलतज्ज्ञ डॉ. पतंगे सर यांनी शस्त्रक्रियेनंतर रुग्णाला यशस्वीरीत्या एक्सट्यूबेट केले. त्यामुळे रुग्णाला व्हेंटिलेटरची आवश्यकता भासली नाही. पायांमधील उरलेली ताकदही कायम राहिली.
मात्र दुसऱ्याच दिवशी छातीमध्ये रक्त साचल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे छातीत ICD नळी टाकण्यात आली. चार-पाच दिवसांनंतर ती काढण्यात आली. ICU मध्ये फिजिशियन डॉ. महेश वाघमारे आणि डॉ. अजय नरवाडे यांनी रुग्णाची विशेष काळजी घेतली. परिणामी रुग्णाला अवघ्या आठवडाभरात रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला.
यानंतर रुग्णाच्या पायातील ताकद हळूहळू वाढत गेली. शस्त्रक्रियेनंतर दोन आठवड्यांनी ती महिला कोणत्याही आधाराशिवाय स्वतःच्या पायावर चालत टाके काढण्यासाठी रुग्णालयात आली. हा क्षण पाहून उपचार करणाऱ्या संपूर्ण टीमला मोठा आनंद झाला.
“Harder the target, more is the joy achieving it.” या भावनेतून डॉ. रामपूरकर यांनी या शस्त्रक्रियेचे आव्हान स्वीकारले. नांदेडमध्ये यापूर्वी अशा प्रकारची फुफ्फुसापर्यंत पोहोचलेली मज्जारज्जूची गाठ काढण्याची शस्त्रक्रिया झालेली नव्हती. स्वतःसाठीही अशा स्वरूपाची शस्त्रक्रिया ही पहिलीच असल्याने हे मोठे आव्हान होते. मात्र योग्य नियोजन, आत्मविश्वास आणि संपूर्ण टीमच्या सहकार्यामुळे हे आव्हान यशस्वीपणे पेलता आले.
या यशस्वी शस्त्रक्रियेतून “क्रियासिद्धिः सत्त्वे भवति महतां नोपकरणे!” हा संस्कृत श्लोक सार्थ ठरतो. कार्य सिद्धीस नेण्यासाठी केवळ साधने नव्हे, तर ध्येय, आत्मविश्वास आणि प्रयत्नांची ताकद महत्त्वाची असते, असा संदेश या यशस्वी उपचारातून मिळतो.
डॉ. मयुरेश मिलिंद रामपूरकर
तुकामाई हॉस्पिटल, नांदेड

