लातूरला ‘व्हॉईस ऑफ मीडियाचे महिला पत्रकारांसाठी राज्य अधिवेशन सुनंदा पवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन, तर डॉ. आशा देशपांडे यांच्या हस्ते समारोप.
लातूरला ‘व्हॉईस ऑफ मीडियाचे महिला पत्रकारांसाठी राज्य अधिवेशन
सुनंदा पवार यांच्या हस्ते होणार उद्घाटन, तर डॉ. आशा देशपांडे यांच्या हस्ते समारोप.
राजश्री पाटील, वैशालीताई देशमुख, फराह खान, डॉ. कविता राणे यासह राज्यातील अनेक ज्येष्ठ महिला पत्रकार यांचा सहभाग
लातूर : ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ‘व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’, महाराष्ट्र महिला विंगच्या वतीने राज्यस्तरीय महिला पत्रकार अधिवेशनाचे आयोजन २४ व २५ ऑक्टोबर २०२६ रोजी थोरमोटे लॉन्स, औसा रोड, लातूर येथे करण्यात आले आहे. महिला पत्रकारांचे हक्क, सुरक्षितता, आरोग्य, आर्थिक स्वावलंबन आणि व्यावसायिक सक्षमीकरण या विषयांवर या दोन दिवसीय अधिवेशनात विचारमंथन होणार आहे.
७८ देशांमध्ये विस्तारलेल्या आणि ७ लाख ४० हजारांहून अधिक पत्रकारांना जोडणाऱ्या ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ‘व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’ या संघटनेच्या महिला विंगच्या माध्यमातून महाराष्ट्रातील ३६ जिल्ह्यांतील महिला पत्रकारांना एकत्र आणून संघटनात्मक बळकटीकरण, प्रश्नांची मांडणी आणि आगामी वर्षासाठी कृती आराखडा निश्चित करण्याचे नियोजन आहे.
शनिवार, २४ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता अधिवेशनाचे उद्घाटन होणार आहे. ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ‘व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’, चे राष्ट्रीय अध्यक्ष अनिल म्हस्के अध्यक्षस्थानी असतील, तर ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या, उद्योजिका व शिक्षणतज्ज्ञ सुनंदा पवार उद्घाटक म्हणून उपस्थित राहतील. गोदावरी बँक समूहाच्या अध्यक्षा महिला संघटक राजश्री पाटील, वैशालीताई देशमुख आणि प्रसिद्ध टीव्ही अँकर व पत्रकार फराह खान यांची विशेष उपस्थिती असेल. सुनंदा पवार आणि राजश्री पाटील यांची फराह खान प्रगट मुलाखत घेणार आहेत.
रविवार, २५ ऑक्टोबर रोजी समारोप सत्रात प्रा. डॉ. आशा देशपांडे या ‘पत्रकारितेतील महिलांचे स्थान आणि अपेक्षित बदल’ या विषयावर, तर डॉ. कविता राणे या ‘माझी स्वतंत्र पत्रकारिता आणि पत्रकारितेच्या माध्यमातून सामाजिक योगदान’ या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. लातूरच्या महापौर जयश्रीताई सोनकांबळे, जिल्हा परिषद अध्यक्ष उषाताई संभाजी पाटील तळेगावकर ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ‘व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’चे प्रदेशाध्यक्ष विजय चोरडिया यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
अधिवेशनात महिला पत्रकारांच्या समस्या, सुरक्षितता, आरोग्य, आर्थिक सुरक्षा, आरोग्य विमा, समान संधी, डिजिटल पत्रकारिता, कृत्रिम बुद्धिमत्ता ए आय, सायबर सुरक्षा आणि तथ्य पडताळणी यांवर चर्चा होईल. तसेच २० महत्त्वपूर्ण ठराव मांडणे, जिल्हानिहाय कामाचा आढावा घेणे, प्रशिक्षण व कल्याणकारी उपक्रमांचे नियोजन करणे आणि मंजूर ठरावांच्या अंमलबजावणीसाठी शासनाकडे पाठपुरावा करण्याची दिशा निश्चित केली जाणार आहे.
“महिला पत्रकारांचा सन्मान, सुरक्षितता आणि आर्थिक स्वावलंबन हे केवळ चर्चेचे विषय न राहता त्यासाठी ठोस कृती होणे आवश्यक आहे. महाराष्ट्रातील महिला पत्रकारांना एकत्र आणून त्यांच्या प्रश्नांना प्रभावी व्यासपीठ देणे, संघटनात्मक एकजूट मजबूत करणे आणि वर्षभरासाठी कृतीशील कार्यक्रम निश्चित करणे, हा या अधिवेशनाचा मुख्य उद्देश आहे. राज्यातील निमंत्रित महिला पत्रकारांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन या सक्षमीकरणाच्या चळवळीला बळ द्यावे,” असे आवाहन ‘व्हॉईस ऑफ मीडिया’ ‘व्ही ओ एम इंटरनॅशनल फोरम’च्या महिला विंगच्या महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष,प्रमुख वैशाली पाटील यांनी केले.
अधिवेशनाच्या आयोजनात राष्ट्रीय महिला संघटक रश्मी मारवाडी, विभागीय प्रदेशाध्यक्ष रोशनी बैस व सोनल महाडिक यांच्यासह महिला विंगचे राज्यस्तरीय पदाधिकारी, विभागीय अध्यक्ष आणि जिल्हाध्यक्ष सहभागी आहेत. महिला पत्रकारितेला अधिक सक्षम, सुरक्षित आणि प्रभावी बनवण्यासाठी हे अधिवेशन महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे आयोजक वैशाली पाटील यांनी सांगितले.
——————-

