भाजपा घेणार लोकसभा क्षेत्राचा आढावा 24 ला प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यवतमाळात.
भाजपा घेणार लोकसभा क्षेत्राचा आढावा
24 ला प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यवतमाळात
यवतमाळ : लोकसभा निवडणुकीची तयारी सुरु झाली आहे. भाजपाने यापूर्वीच 48 लोकसभा क्षेत्रात प्रचार प्रमुख नेमत मागील महिन्यातच रणशिंग फुंकले आहे. या पार्श्वभूमीवर उद्या 24 ऑगस्ट रोजी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यवतमाळ वाशिम लोकसभा क्षेत्राचा आढावा घेणार आहेत.
भारतीय जनता पार्टी चोवीस तास अष्टोप्रहर निवडणूकीच्या कामात लक्ष घालून असते. संघटनात्मक बांधणी आणि आलेल्या अथवा येवू शकणाऱ्या अडचणींवर काम करणे ही भाजपाची जमेची बाजू आहे. यासाठी संघटनप्रमुख प्रत्येक लहानसहान बाबींवर लक्ष केंद्रित करुन असतात. निवडणुका आल्या की फक्त उमेदवार उभे करणे राजकारण नव्हे, तर उमेदवार ज्या क्षेत्रात लढणार आहे, त्या क्षेत्रातील अडचणी काय आहेत? उणीवा काय आहेत? हे समजुन घेणारा सक्षम उमेदवार शोधणे ! त्या उमेदवाराला जनसामान्यांचे समर्थन आहे का ? हे चाचपणे अशा अनेक विषयांवर काम करण्याला भाजपा प्राधान्य देते. याच पद्धतीचा एक भाग म्हणून भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे उद्या 24 ऑगस्ट रोजी यवतमाळात आढावा बैठक घेणार आहेत. स्थानिक उत्सव मंगल कार्यालयात आयोजित बैठकीत प्रदेशाध्यक्ष बावनकुळे विधानसभा निहाय बैठक घेणार आहेत. यवतमाळ, दिग्रस आणि राळेगाव ह्या तीन विधानसभा क्षेत्राच्या बैठका होणार असून त्यात प्रत्येक विधानसभेतून प्रमुख 100 सदस्य आमंत्रित करण्यात आले आहेत.
यवतमाळ येथील बैठकीनंतर वाशिम येथे देखील अशाच स्वरूपाची बैठक आयोजित करण्यात आली आहे. त्यात वाशिम,कारंजा, पुसद विधानसभा क्षेत्राचा समावेश असणार आहे. संपर्क से समर्थन अभियानातून भाजपा आणि मोदीजीनी 9 वर्षात केलेली कामे घराघरापर्यंत पोहचविण्याचा हा एक प्रयत्न असल्याचे यावेळी यवतमाळ वाशीम लोकसभा प्रमुख नितीन भुतडा यांनी प्रसिध्दी पत्रकातून सांगितले आहे