अधिक मासामुळे बाप्पांचे आगमन लांबले गणेशभक्तांना आतुरताः १९ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर गणेशोत्सव.

अधिक मासामुळे बाप्पांचे आगमन लांबले
गणेशभक्तांना आतुरताः १९ सप्टेंबर ते २८ सप्टेंबर गणेशोत्सव
मुळावा : यंदा अधिक मासामुळे गणपती बाप्पांचे आगमन लांबले असून स्थापना १९ दिवस उशिराने होणार आहे. गतवर्षी गणपती बाप्पांचे आगमन ३१ ऑगस्टला झाले होते. यावर्षी बाप्पा घरोघरी १९ सप्टेंबरला विराजमान होणार आहेत. तर अनंत चतुर्दशी २८ सप्टेंबर रोजी आहे.
बाप्पांच्या आगमनाची गणेशभक्तांना आतुरता लागली आहे. यंदा मूर्तिकारांना मूर्ती घडवण्यासाठी अधिकचा वेळ मिळाला आहे. तरीही
मूर्तिकार जोमाने कामाला लागले असून लाखो मूर्ती तयार करण्यात दिवस-रात्र व्यस्त असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मागील वर्षी ३१ ऑगस्ट २०२२ ला गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांचे आगमन झाले होते. तर ९ सप्टेंबरला अनंत चतुर्दशीच्या दिवशी साश्रू नयनांनी निरोप देण्यात आला होता. मात्र, यंदा १९ सप्टेंबरला गणेश चतुर्थीपासून गणेशोत्सवाला सुरु होणार असून, २८ सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे.
यावर्षी गणरायाचा मुक्काम १० दिवसांचा असणार आहे.
गणेशोत्सव सुरू होण्यासाठी अजून महिना बाकी आहे. मूर्तिकारांनी मार्च महिन्यापासूनच मूर्ती घडवण्याची लगबग सुरू केली आहे. जसजसे दिवस जात आहेत, तसतसे मूर्ती बनवण्याचा वेग वाढत आहे. सध्या मूर्ती बनवणे व त्याचे फिनिशिंग करणे सुरू आहे. काही दिवसांनंतर रंगरंगोटीचे काम सुरू होईल. मूर्तिकार सदैव गणपती बाप्पा विविध रूपात साकारण्याचा प्रयत्न करत असतात. यंदा अधिक मासामुळे जास्तीचा वेळ बाप्पांच्या नवनवीन स्वरूपातील मूर्ती बनविण्यासाठी मिळाला असून, मूर्तिकार नवीन मूर्ती घडवत आहेत.
कोट
कच्च्या मालाच्या किमती महागल्यामुळे त्याचा परिणाम यावर्षी मूर्तीच्या किमती वाढल्या जरी असल्यातरी गणेशोत्सवावर याचा काहीही परीणाम झालेला नाही, मंडळाचे कार्यकर्ते, भाविक व मूर्तीकार यांच्यामध्ये येणार्या उत्सवामुळे उत्साह आहे आणि विशेष करून शासनाने पीओपी च्या मूर्तींना शिथिलता दिल्यामुळे शासनाचे आभार कारण मातीच्या मूर्तीच्या किमती मुळे किमती खूप वाढल्या असत्या
निशांत धकाते, मूर्तिकार