सुतार समाजाचा राज्यस्तरीय महा मेळावा संपन्न संत भोजलिंग काका महामंडळाची स्थापना करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुतार समाज महामेळाव्यात घोषणा
सुतार समाजाचा राज्यस्तरीय महा मेळावा संपन्न
संत भोजलिंग काका महामंडळाची स्थापना करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सुतार समाज महामेळाव्यात घोषणा
उमरखेड
“सुतार समाजाच्या उन्नतीसाठी संत भोजलिंग काका आर्थिक विकास महामंडळाची स्थापना करून ५० कोटींचा निधी तातडीने मंजूर केला जाईल,” असे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी येथे दिले.
महाराष्ट्र राज्य विश्वकर्मीय सुतार समाज समन्वय समिती, सकल सुतार समाज आणि सलग्न संस्थेच्या वतीने आळंदी येथे विश्वकर्मा सुतार समाजाचा राज्यस्तरीय महामेळावा आयोजित केला होता. यावेळी मुख्यमंत्री शिंदे मंत्रालयातून व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे सहभागी झाले होते. त्यावेळी ते बोलत होते.
शिंदे म्हणाले, “सुतार समाजाच्या १३ मागण्यापैकी महामंडळ स्थापनेची घोषणा आजच करतो, तर उर्वरित १२ मागण्यांसाठी एक स्वतंत्र बैठक घेऊन सकारात्मक निर्णय घेतला जाईल.”
मानकर म्हणाले, “सुतार समाजाच्या उत्थानासाठी संत भोजलिंग आर्थिक विकास महामंडळ स्थापन करावे, यासाठी किमान ५० कोटींची तरतूद करावी, केंद्रीय आर्टिझन शिष्यवृत्ती योजना पाल्यांना विनाअट लागू करावी, पिढ्यान् पिढ्या कलेच्या माध्यमातून सुतार समाजाने विविध ऐतिहासिक किल्ले, महाल, वास्तू तथा शिल्पे निर्माण केलेली आहेत. या ऐतिहासिक वास्तूंद्वारे सरकारकडे जो महसूल जमा होतो, त्यातून किमान २५ टक्के वाटा पारंपरिक कारागिरांना द्यावा.
” लांडगे म्हणाले, “सुतार समाजाने विश्वकर्मा कौशल्य विकास योजनेचा लाभ घेऊन स्वतःला सक्षम करावे. समाजाचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मी पाठपुरावा करेन.
” रायमूलकर म्हणाले, “सामाजिक समस्या सोडविण्यासाठी समाजाने एकत्रित आले पाहिजे, तरच आमच्यासारखे नेते झुकतात. शासनाकडून आपल्या समाजाच्या जास्तीत जास्त मागण्या आपल्या पदरात पाडून घेण्याचा माझा प्रयत्न राहील.” महामेळाव्यास राज्यभरातील नागरिक उपस्थित होते. डॉ. सुनील धनगर यांनी सूत्रसंचालन केले. प्रास्ताविक ग्रंथ मित्र रमेश सुतार यांनी तर गणपत गायकवाड यांनी आभार मानले.
आमदार महेश लांडगे, आमदार डॉ. संजय रायमुलकर, शिवसेना पुणे शहरप्रमुख प्रमोद भानगिरे, विश्वकर्मीय सुतार समाजाचे मुख्य प्रशासकीय राज्य समन्वयक प्रा. विद्यानंद मानकर, पी. जी. सुतार, राज्य समन्वयक दिलीप अकोटकर, हनुमंत पांचाळ, रवींद्र सुतार, प्रदीप जानवे, आनंद मिस्त्री, विजय रायमूलकर, भगवान राऊत, संजय बोराडे, नारायण क्षीरसागर, ज्ञानेश्वर सुतार, हरिदास इंगोलकर, गणपत गायकवाड, अरुण सुतार, अर्जुन सुतार, विलास भालेराव, नारायण भागवत, भगवान श्राद्धे, प्रविण इंगळे, कैलास दहेकर, संजय ईश्वरकर, पिंटू इंगळे, मारोती सुर्यवंशी आदी उपस्थित होते.
चौकट
मेळाव्याचे वैशिष्ट्य
■ मेळाव्याच्या उद्घाटनापूर्वी संतोष महाराज ताजणे यांच्या मार्गदर्शनाखाली आळंदीतून *१००० बाल वारकऱ्यांसह संत भोजलिंग काका प्रासादिक दिंडी* काढण्यात आली. ज्ञानेश्वर माउली देवस्थान ट्रस्टला दोन किलो चांदीच्या पादुका अर्पण केल्याबद्दल दत्तात्रेय सुतार (इचलकरंजी) यांचा विशेष सत्कार करण्यात आला.
■ भोजलिंग काकांच्या दोन किलो चांदीच्या पादुका आळंदी देवस्थानला इचलकरंजी येथील समाज बांधवांकडून माउलींना आलिंगन देऊन दिल्या गेल्या त्यामुळे सुतार समजाच्या भोजलिंग काकाप्रती असलेल्या भावना आळंदी देवस्थानच्या विश्वस्तांना उत्स्फूर्तपणे जाणवल्या
■ हजारो सुतार समाज बांधव संपूर्ण मराठवाडा, विदर्भ, कोकण, अहमदनगर, कोल्हापूर, सातारा, सांगली, पनवेल, श्रीवर्धन, रायगड, मुंबई,नाशिक येथून सुतार समाज उत्स्फूर्तपणे मेळाव्यासाठी उपस्थित होता त्याला स्थानिक पुणे व आळंदी स्थित समाजाच्या उपस्थितीने सभागृह खच्चून भरले होते
Pretty! This has been a really wonderful post. Many thanks for providing these details.