एकही पूरग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाही – पालकमंत्री संजय राठोड

youtube

एकही पूरग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाही
– पालकमंत्री संजय राठोड

उमरखेडमधील ५०० पूरग्रस्तांना २४.६५ लाखाचे अनुदान वाटप

वाढीव ५ हजाराची मदत तात्काळ वाटप करण्याचे निर्देश

 

१५ ॲागस्टपर्यंत नुकसानीचे अहवाल शासनास सादर करा

यवतमाळ, दि.६ :  –  मागील काही दिवसांपूर्वी अतिवृष्टीमुळे नद्यानाल्यांना आलेल्या पुराने मोठ्या प्रमाणात शेती पीके, घरे, शासकीय मालमत्तेचे नुकसान झाले आहे. या नुकसानीपोटी पुरग्रस्तांना पहिल्या टप्प्यातील सानुग्रह अनुदानाचे वाटप करण्यात आले आहे. वाढीव पाच हजाराची मदत तात्काळ वाटप करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्ह्यातील एकही पुरग्रस्त मदतीपासून वंचित राहणार नाही, असे पालकमंत्री संजय राठोड यांनी सांगितले.

उमरखेड तालुक्यातील विविध विषयांसंदर्भात पालकमंत्री श्री.राठोड उपविभागीय अधिकारी कार्यालयात आढावा घेतला. त्यावेळी ते बोलत होते. बैठकीला उपविभागीय अधिकारी डॉ.व्यंकट राठोड, तहसीलदार अनंत देऊळगावकर, गटविकास अधिकारी प्रविण वानखेडे, कार्यकारी अभियंता प्रिया पुजारी, भूमेश दमाहे यांच्यासह कृषी, महसूल, पंचायत समिती आदी विभागाचे अधिकारी, लोकप्रतिनिधी व ग्रामस्थ उपस्थित होते.

जिल्ह्यातील सर्व महसूल मंडळांमध्ये ६५ मिमीपेक्षा जास्त पाऊस पडला आहे. यवतमाळमध्ये विक्रमी पाऊस झाला. या अतिवृष्टीमुळे आलेल्या पुराने अनेक भागात शेती, घरांसह शासकीय मालमत्तेचे नुकसान झाले. शेतीपिके पिवळी पडली. या नुकसानीचे पंचनामे काही भागात पूर्ण झाले असून उर्वरित पंचनामे पूर्ण करावेत. नुकसानग्रस्त शेतजमिनीचे तीन प्रकारात पंचनामे करावेत. त्यात दुरुस्त होवू न शकणाऱ्या शेतजमिनी, पुन्हा वापर होवू शकणाऱ्या शेतजमिनी आणि पिके खराब झालेल्या शेतजमिनी अशी विभागणी करुन नुकसानीचा अहवाल १५ ॲागस्टपूर्वी शासनाला सादर करण्याचे निर्देश दिलेले आहेत. या नुकसानग्रस्तांना राज्य शासन भरीव मदत देणार असल्याचे पालकमंत्री श्री. राठोड यांनी यावेळी सांगितले.

पुराचे पाणी घरात शिरुन नुकसान झालेल्या उमरखेडमधील ५०० कुटुंबांना २४ लाख ६५ हजारांचे सानुग्रह अनुदान वाटप झाले असून वाढीव पाच हजाराची मदत तात्काळ वाटप करण्याचे निर्देश पालकमंत्र्यांनी दिले. तालुक्यात बाधीत कुटुंबांना ५० क्विंटल गहू आणि ५० क्विंटल तांदूळ वाटप झाले आहे. शासनाच्या मदतीपासून कोणीही वंचित राहणार नाही याची काळजी घेण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. राठोड प्रशासनाला दिले.

पुरामुळे अनेकांचे महत्वाचे कागदपत्रे वाहून गेले आहेत. त्यांना नवीन प्रमाणपत्र देण्यासाठी कारवाई करावी. तसेच घरकूल, आवास योजनांचा सर्वसामान्यांना फायदा पोहचविण्यासाठी जलदगतीने काम करावे. शाळा अंगणवाड्या, रस्ते आणि पुलासह महावितरण विभागाच्या मालमत्तेचेही नुकसान झाले असून त्याचा अहवाल शासनाला सादर करावा. जलयुक्त शिवार, नाला खोलीकरण व सरळीकरणाची कामे केली जाणार आहेत. याबाबत नाविण्यपूर्ण कामे सुचवावीत. जलसंधारणाच्या कामांसाठी निधीची कमतरता नाही. कामे सुचवितांना पूरबाधित गावातील कामांना प्राधान्य द्यावे, असे पालकमंत्री श्री.राठोड यांनी सांगितले.

अतिवृष्टीग्रस्तांना अनुदानाचे वाटप
आढावा बैठकीनंतर पालकमंत्री संजय राठोड यांच्याहस्ते अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या नुकसानग्रस्तांना प्रत्येकी ५ हजार रुपयांच्या सानुग्रह अनुदानाचे धनादेश वाटप करण्यात आले.

खडकाजवळील नुकसानग्रस्त बंधाऱ्याची पाहणी
नदीनाल्यांना आलेल्या पुरामुळे नागपूर- तुळजापूर राष्ट्रीय महामार्गावरील महागाव तालुक्यातील खडकाजवळील बंधारा वाहुन गेला होता. या बंधाऱ्याची आणि तेथील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी पालकमंत्र्यांनी केली. यावेळी त्यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला.

Google Ad
Google Ad

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!