माणसासारखे जगण्यासाठी भक्ती व गुरू करून सामर्थ्य वाढवले पाहिजे..!” – प. पू. कानिफनाथजी महाराज शेगांव
माणसासारखे जगण्यासाठी भक्ती व गुरू करून सामर्थ्य वाढवले पाहिजे..!” – प. पू. कानिफनाथजी महाराज
शेगांव
परमपूज्य कानिफनाथजी महाराज यांचा 10 व 11 फेब्रुवारी 2025 रोजी ज.न.म. संस्थान, उपपीठ पश्चिम विदर्भ, चिंचोली फाटा (सवर्णा), खामगाव हायवे, ता. शेगाव, जि. बुलढाणा येथे समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा पार पडला.
सर्व प्रथम प. पू. कानिफनाथजी महाराज यांचे यजमानाच्या हस्ते शोडशोपचार पाद्यपूजन करण्यात आले. तद्नंतर प. पू. कानिफनाथ महाराज यांनी उपस्थित भाविकांना मार्गदर्शन केले,त्या वेळी त्यांनी असे सांगितले की गुरुर्ब्रम्हा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा |
गुरु साक्षात परब्रम्ह तस्मै श्री गुरुवे नमः||
गुरु हाच ब्रह्म आहे गुरु हाच विष्णू आहे गुरु हाच महेश्वर आहे, नव्हे नव्हे तर गुरु हाच चिरंजीव परब्रह्म आहे जो हे मानतो आणि त्याप्रमाणे जगतो, त्या परब्रम्हा सोबत अनुसंधान साधल्यास त्याच्या जीवनामध्ये समस्या या येतच नाही. गुरु हे व्यक्ती नसून ते तत्व आहे आणि ज्या साधकाच्या अंगी अनन्यसाधारण बदल घडून आलेला आहे तो त्या तत्त्वाला उपलब्ध होतो असे त्यांनी सांगितले.
आणि जो व्यक्ती हे गुरुतत्त्व आपल्या चित्तामध्ये वसवतो त्याला वाढवतो त्याच्या आयुष्यामध्ये ज्या अनावश्यक गोष्टी आहे त्या लय होतात, ज्या नवीन गोष्टी आपल्यामध्ये निर्माण व्हायला पाहिजे त्या निर्माण होतात आणि जे वेळेनुसार परिस्थितीनुसार योग्य आहे ते करण्यासाठी आपण सक्षम होतो. हीच तीन तत्त्व आहेत ब्रह्मा, विष्णू आणि महेश हेच ते तीन तत्त्व आहेत जे सृजनाचं(विष्णू), उत्पत्तीचं(ब्रह्मा) आणि लयाच(महेश) काम करतात. स्थिती, उत्पत्ती आणि लय. हे प्रत्येक मनुष्याच्या अंगी आहे त्यालाच आपण रज- तम -सत्व म्हणतो, असे त्यांनी सांगितले.
सत्वगुणाने निर्मिती होते चांगल्या गोष्टींची आपल्यामध्ये नवीन निर्मिती होते रजगुणाने स्फूर्ती, चालना मिळते आणि तमगुणाने आपणच आपला ह्रास करून घेतो. अशी ही श्रृंखला. अध्यात्म हा महासागर आहे असे त्यांनी भक्तांना संबोधित केले.
तुम्ही माणूस म्हणून जन्माला आले आहात तर माणसाप्रमाणे जगायला हवे असे मौल्यवान वचन त्यांनी सांगितले नाही तर माणूस म्हणून जन्माला आले प्राण्यासारखे वागले तर आयुष्यामध्ये समस्या ह्या येणारच. आपली प्रवृत्ती ही मानवाची आहे तर मानवाप्रमाणे कर्म करावे मानवाप्रमाणे वाणी असावी असे त्यांनी भक्तांना संबोधिले.
व्यक्तीच्या जे चित्तामध्ये, कर्मामध्ये, भावनेमध्ये आहे त्याप्रमाणेच त्याला जीवनामध्ये फळ आणि परिणाम मिळत असतात.
माणसाने माणसासारखं जगण्यासाठी मनाचं सामर्थ्य वाढवलं पाहिजे आणि हे सामर्थ्य स्वामीजी सांगतात की भक्तिने वाढते म्हणून मानव जन्मामध्ये आलेल्या प्रत्येकाने भक्ती व गुरु करायला पाहिजेच असे त्यांनी उदबोधन केले. आणि स्वामीजींचा उपदेश तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा आणि स्वप्नात सुद्धा कुणाचे वाईट चिंतू नका याचे तंतोतंत पालन केल्यास आयुष्यामध्ये समस्या येणार नाही आणि मानवाला जे सुख, समाधान, आनंद आणि शांती अपेक्षित आहे ती मिळण्यास मदत होईल. आज या ठिकाणी माणसाने माणसासारखं जगण्यास शिकू हा संदेश त्यांनी भक्तजनांना दिला.
दिनांक 10 फेब्रुवारी 2025 रोजी समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळ्यामध्ये 678 भाविकांनी उपासक दिक्षा घेतली व 11 फेब्रुवारी 2025 रोजी 958 भक्तगणांनी साधक दीक्षा घेतली. आजच्या या भव्य दिव्य कार्यक्रमाला 20 ते 22 हजार भाविकांनी उपस्थित राहून अमृतमय प्रवचनाच्या व दर्शनाचा तसेच महाप्रसादाचा लाभ घेतला. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पश्चिम विदर्भ पीठ समिती, आश्रम सेवा समिती, सर्व जिल्हा सेवा समिती, सर्व गुरु सेवक समिती, प्रवचनकार समिती, तालुका सेवा समिती, सेवा केंद्र समिती, आरती केंद्र समिती, युवा सेना, महिला सेना, हिंदू संग्राम सेना, सर्व आजी-माजी पदाधिकारी सर्वांनी अतिशय मेहनत घेतली.
असाच भव्य दिव्य जगद्गुरुश्रींचा समस्या मार्गदर्शन व दर्शन सोहळा कार्यक्रम पुन्हा 8 आणि 9 ऑगस्ट 2025 पश्चिम विदर्भ उपपीठ शेगाव जिल्हा बुलढाणा येथे होणार आहे. अशी माहिती पश्चिम विदर्भ पीठ प्रमुख श्री कुंडलिकराव वायभासे, व्यवस्थापक श्री सुरेश मोरे आणि पीठ प्रसिद्धी प्रमुख अमर इधोळ यांनी दिली.

