उमरखेड नगर परिषदेत ‘त्रिमूर्ती सरकार’चा मनमानी कारभार? विकासकामे ठप्प असल्याचा भाजप गटनेत्यांचा पत्रकार परिषदेत आरोप

youtube

उमरखेड नगर परिषदेत ‘त्रिमूर्ती सरकार’चा मनमानी कारभार? विकासकामे ठप्प असल्याचा भाजप गटनेत्यांचा पत्रकार परिषदेत आरोप

उमरखेड : नगर परिषदेत जनशक्ती पॅनलच्या सत्तेला आठ महिने पूर्ण झाले असतानाही शहरातील विकासकामांना अपेक्षित गती मिळालेली नाही. पाचही विषय समित्यांच्या सभापतींना पुरेसे आर्थिक व प्रशासकीय अधिकार दिले जात नसल्याने नगर परिषदेचा कारभार गोंधळात सापडला असून, ‘दोन भाऊ आणि एक साहेब’ यांच्या मनमानीमुळे कर्मचारीही संभ्रमात असल्याचा गंभीर आरोप भाजपचे नगरपरिषद गटनेते विजय हरडफकर यांनी केला.

रविवार, १६ ऑगस्ट रोजी आयोजित पत्रकार परिषदेत हरडफकर यांनी सत्ताधाऱ्यांच्या कारभारावर जोरदार टीका केली. यावेळी विजय गुजरे, नगरसेवक गोपाल कलाने व संदीप घाडगे उपस्थित होते.

कंत्राटी शिक्षक भरतीवर ७० लाखांचा बोजा

शिक्षण विभागाने अतिरिक्त ९९ कंत्राटी शिक्षकांची भरती करून नगर परिषद फंडावर सुमारे ७० लाख रुपयांचा बोजा टाकल्याचा आरोप हरडफकर यांनी केला. काही शाळांमध्ये विद्यार्थी संख्या अत्यल्प असतानाही शिक्षकांची भरती करण्यात आली असून, शासनाकडे शिक्षकांची मागणी करण्याऐवजी नगर परिषद निधीतून खर्च केला जात असल्याचे त्यांनी सांगितले. दुसरीकडे काही शाळांमध्ये विद्यार्थ्यांना बसण्यासाठी पुरेशी व्यवस्था नसताना सीसीटीव्ही व डिजिटल बोर्डवर खर्च केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

गढूळ पाणी, अनियमित पुरवठ्याचा आरोप

शहरातील अनेक भागांत अनियमित तसेच गढूळ पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. पाणीपुरवठा विभागाच्या कामकाजावरही त्यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. क्लोरिन, तुरटी तसेच कंत्राटी कामगारांच्या खर्चाबाबत पारदर्शकता आवश्यक असल्याचे सांगत संबंधित कागदपत्रे व माहिती सार्वजनिक करण्याची मागणी त्यांनी केली.

बांधकाम विभागात आठ महिन्यांत नवीन कामे नाहीत?

गेल्या आठ महिन्यांत बांधकाम विभागामार्फत नवीन विकासकामांना अपेक्षित चालना मिळाली नसल्याचा आरोप करण्यात आला. प्रशासकीय काळात मंजूर झालेल्या कामांवरच काम सुरू असल्याचे सांगत, रस्ते, नाल्या व इतर मूलभूत सुविधांची कामे रखडल्याचा दावा हरडफकर यांनी केला. मुरुम टाकण्यासारख्या कामांमध्येही पारदर्शक निविदा प्रक्रिया पाळली जाते का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.

आरोग्य विभागासह कर्मचारी भरतीवरही सवाल

शहरातील कचरा, नालीसफाई व स्वच्छतेच्या प्रश्नांकडे आरोग्य विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला. विविध विभागांत अतिरिक्त कर्मचारी भरती करून नगर परिषदेला ‘रोजगार देण्याचे दुकान’ बनविले जात आहे का, असा सवालही भाजप गटनेत्यांनी उपस्थित केला.

याशिवाय नगर परिषदेतील कारभाराबाबत प्रश्न उपस्थित करणाऱ्या विरोधकांना धमक्या दिल्या जात असल्याचा आरोप त्यांनी केला. काही प्रकरणांबाबत पुरावे गोळा करून जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रारी करण्यात आल्याचे सांगत, संबंधित तक्रारींवर अद्याप कारवाई का झाली नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

‘खुर्ची आणि चिरीमिरी हेच ध्येय’

“जनतेने विकासाला प्राधान्य देत सत्ताधाऱ्यांना बहुमत दिले; मात्र शहराचा विकास कुठेच दिसत नाही. सत्ताधाऱ्यांना विकासकामांसाठी निधीही जुळवता येत नसल्याची केविलवाणी परिस्थिती आहे. ‘कुंकू आम्ही लावतो, पाळणा तुम्ही हलवा’ अशी सध्याची अवस्था झाली आहे. जनतेने दिलेल्या विश्वासाला न्याय देण्याऐवजी केवळ खुर्ची आणि चिरीमिरी हेच ध्येय असल्याचे दिसते,” असा घणाघाती आरोप विजय हरडफकर यांनी केला.

सत्ताधाऱ्यांनी या आरोपांवर आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

4 thoughts on “उमरखेड नगर परिषदेत ‘त्रिमूर्ती सरकार’चा मनमानी कारभार? विकासकामे ठप्प असल्याचा भाजप गटनेत्यांचा पत्रकार परिषदेत आरोप

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

ताज्या बातम्या

error: Content is protected !!